कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करा : क्रुऊबास सभापती दीपक आडे
पणन महासंघाकडे केली मागणी ; १२०० शेतकऱ्यांचा ४० हजार क्विंटल कापूस पडून
रियाज पारेख :९६३७८८६७७७
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
महागाव :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर , कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पणन महासंघाने
मार्च महिन्यापासून बंद करण्यात आलेली कापूस खरेदी त्वरित सुरू करण्याची मागणी महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक आडे यांनी जिल्हाधिकारी , पणन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांना एका पत्रातून केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या तब्बल १२०० शेतकऱ्यांच्या कापूस विक्रीच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.तब्बल बाराशे शेतकऱ्यांकडे अंदाजित ४० हजार क्विंटल कापूस पडून आहे . अवघ्या काही दिवसात खरीप पेरणी येवून ठेपली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेले कापूस चिंतेची बाब ठरत आहे.बी बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याकडे कापूस विकल्या शिवाय आर्थिक आवक नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे .जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याने पेरणीची पुर्वतयारी करिता शेतकऱ्याकडे केवळ मे महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यातही घरातला कापूस विकल्या जात नाही तो पर्यंत शेतकरी पेरणीसाठी कसा सज्ज होणार हा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे.
महागाव तालुक्यातील गुंज येथील मंजित कॉटन शेतकऱ्यांचा माल घेण्यास अनुकूल आहे.परंतु सदर केंद्रावर अगोदरच १५ हजार क्विंटल सरकी पडून आहे.ती उलण्यासाठी पणन संघाकडून हालचाल करण्यात आली नाही. पणन संघाने याकडे लक्ष केंद्रित केल्यास गुंज येथील मंजित कॉटन हे खरेदी केंद्र सुरू करण्यास समर्थ आहे. पणन संघाने सरकी उचलण्यास हयगय केल्यास सदर केंद्र सुरू होणे शक्य दिसत नाही.परिणामी शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना कवडी मोल भावात पांढरे सोने विकावे लागणार आहे.
शेतकऱ्यांची वाढती मागणी पाहता कृषी उत्पन्न
बाजार समितीचे सभापती दीपक आडे यांनी जिल्हाधिकारी , पणन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांना पत्राद्वारे केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.