राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या उष्म्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. या उन्हाच्या दिवसांत विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तापमानामध्ये जेव्हा वाढ होते, तेव्हा उष्णतेशी संबंधित आजार आणि उष्माघाताची प्रकरणे वाढीस लागतात.
सतत घाम आल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे प्रचंड थकवा येणे, गळून गेल्यासारखे वाटणे, सतत झोप येणे किंवा निद्रानाश, भूक मंदावणे, हातापायाची, डोळ्यांची आग होणे, मळमळ, उलटी यांसारख्या लक्षणांची तीव्रता वाढते. वाढत्या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी काही बाबींचे पालन करायला हवे, असे डॉक्टरांनी सांगितले.
त्वचेचे विकार
उष्णतेमुळे त्वचेवर लालसरपणा, खाज, लहान पुरळ किंवा फोड येऊ शकतात. हे अधिक घाम येणाऱ्या शरीराच्या भागांमध्ये दिसून येते. योग्य काळजी न घेतल्यास त्या भागात संसर्ग होण्याची शक्यताही वाढू शकते.
याचे पालन करा
उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य ठेवणे गरजेचे आहे. हलक्या रंगाचे, सैल आणि शक्यतो सुती कपडे घालावेत. छत्री, टोपी, स्कार्फचा वापर करावा. उन्हात जास्त वेळ उभे राहणे टाळावे. तेलकट पदार्थ टाळावेत. अतिथंड पेयांचा मारा करू नये.
‘ओआरएस’चा पर्याय
जास्त घाम आल्यामुळे शरीरातून पाणी आणि क्षार दोन्ही बाहेर पडतात. ही कमतरता भरून काढताना फक्त साधे पाणी घेणे पुरेसे नसते. थकवा व तहान अधिक असेल तर ‘ओआरएस’ घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अशक्तपणा, थकवा आणि स्नायूंमध्ये आकडी येण्यापासून गोंधळल्यासारखे वाटणे, उच्चार अस्पष्ट, गोंधळल्यासारखी अवस्था निर्माण होणे अशी लक्षणे दिसतात.
औषधे वेळेवर घ्या
‘उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे सहआजार असतील, तर वेळेवर दिलेली औषधे घ्या. भूक मंदावली की काही रुग्ण औषधांची एखादी मात्रा घेत नाहीत; तसे केल्याने लक्षणांची तीव्रता अधिक वाढू शकते, हे विसरू नका,’ असा सल्ला फिजिशिअन डॉ. संज्योत गोरे यांनी दिला.
नागपुरात उष्माघाताने १५ जणांचा मृत्यू
राज्यात अनेक ठिकाणी तापमानात सतत वाढ होत असून गेल्या दहा दिवसांमध्ये उपराजधानीत उष्माघाताने १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत हे संशयित उष्माघाताचे बळी असल्याचे सांगितले जात आहे. विदर्भात मागील २४ तासांत तापमानात किंचित घट नोंदवली गेली असली, तरी उष्णतेचा तडाखा कायम असल्याचे चित्र आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस दरम्यान राहिले. अकोला व अमरावती येथे सर्वाधिक ४५.२ अंश तापमानाची नोंद झाली, तर वर्ध्यात ४५ अंश तापमान राहिले. नागपूरमध्येही कमाल तापमान ४४.४ अंशांवर स्थिरावले.
उष्माघाताची लक्षण
चालताना तोल जाणे, चक्कर येणे, मळमळल्यासारखे वाटणे.
शरीराचे तापमान वाढणे, भूक मंदावणे.
पोटदुखी, पोटामध्ये मुरडा येणे.
शरीरातील पाणी कमी होणे.
शुद्ध हरपणे.
ही काळजी घ्या
दुपारी १२ ते ३ या वेळेमध्ये बाहेर जाणे टाळा.
एसीतून बाहेर उष्म्यामध्ये आणि उष्म्यातून थेट एसीमध्ये जाणे टाळा.
थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा.
शिळे अन्नपदार्थ खाऊ नयेत.
अतितिखट, मसालेदार, तेलकट पदार्थांचे सेवन टाळावे.
भूक लागल्यानंतर चहा, कॉफी, शीतपेयांपेक्षा सुकामेवा, एखादे फळ यांचा आहारामध्ये समावेश करावा.

राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..
उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा….
ठाकरेंचा राऊतांना ‘चेक मेट’! आदित्य ठाकरेंनी निर्णय फिरवला आणि संजय राऊतांचा पत्ता कट झाला..?
भाजपनंतर ठाकरे सेना, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची घोषणा; विधान परिषद निवडणुकीसाठी १० उमेदवार कोणते..?
विधान परिषदेसाठी फिल्डींग लावलेल्या 74 जणांना धक्का..!
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….