महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीने घेतला विविध विभागांचा आढावा ; उद्या करणार विविध कामांची पाहणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि 20 ऑक्टोबर :- महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती जिल्ह्याच्या तीन दिवसीय दौऱ्यासाठी आज जिल्ह्यात दाखल झाली असून समितीने आज विविध विभागांचा आढावा घेतला. उद्या समितीमधील सदस्य विविध तालुक्यांचा दौरा करणार असून आदिवासी भागात झालेल्या कामांची पाहणी सुद्धा करणार आहे.
महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती तीन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या समितीचे अध्यक्ष दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन आणि जिल्हा परिषद सभागृह येथे विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी समिती सदस्य आमदार सर्वश्री अशोक उईके, किरण सरनाईक, राजकुमार पटेल, भिमराव केराम, शिरीष चौधरी, राजेश पाडवी, रमेशदादा पाटील, श्रीनिवास वनगा आणि उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव मोहन काकड, जयवंत राणे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसूल विभागातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पदभरती, आरक्षण, अनुशेष तसेच जात पडताळणी आदींबाबत माहिती दिली. यावेळी गृह विभाग, राज्य उत्पादन शुल्क, एस टी महामंडळ, वन विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कृषी विभाग, विद्युत वितरण, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, एकात्मिक प्रकल्प आदिवासी कार्यालय, तसेच जिल्हा परिषद मधील ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग, वित्त विभाग, महिला व बाल कल्याण इत्यादी विभागांकडून अनुसूचित जमाती जनतेसाठी राबविण्यात येणारया विविध कल्याणकारी व विकासात्मक योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन तसेच सर्व विभाग प्रमुख, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
समितीमधील सदस्य उद्या सर्व तालुक्यातील विविध भागाचा दौरा करणार आहे. यात आदिवासी भागात राबविण्यात आलेल्या आदिवासी उपयोजना आणि इतर विकासात्मक कामांचा व योजनांचा आढावा घेऊन पाहणी करतील.