आष्टा-पडसा पैनगंगा ते राणीधानोरा-लोणबेहेळ मार्गास राज्यमार्ग म्हणून मंजुरी ; कॉंग्रेस नेते नामदेवराव केशवे यांच्या प्रयत्नांना यश !
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकीरण देशमुख
माहुर(नांदेड)
तालुक्यातील आष्टा परिसरातील, पडसा, टाकळी,मुरली,गोकुळ, वडसा व इतर गावातील अनेक नागरिकांचे सोयरसंबध व नामांकित बाजारपेठ असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे ये-जा करण्या करीता नागरिकांच्या सोयीचे होईल या उद्दात भावनेने तत्कालीन केद्रीय रस्ते विकास मंत्री तथा विद्यमान केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून पैनगंगा नदीवर पडसा येथे पूल मंजूर करून राष्ट्रीय महामार्ग १६१ अ ते पडसा पैनगंगा नदीपर्यत रस्ता मंजूर करवून मराठवाड्यातील आष्टा परिसर विदर्भातील राणीधानोरा ते लोणबेहेळ ला राष्ट्रीय महामार्ग ३६१ ला जोडून घेतल्यानंतर कॉंग्रेस नेते पणन महासंघाचे संचालक नामदेवराव केशवे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे साकडे घालून आष्टा पडसा पैनगंगा ते राणीधानोरा लोणबेहेळ या २५ की.मी. मार्गास राज्यमार्ग म्हणून मंजुरी मिळवून घेतली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांनी दि.२१ जानेवारी २०२१ च्या शासन निर्णय क्रमांक रवियो-२०२०/प्र.क्र.१०६/नियोजन-२ अन्वये या मार्गाला राज्यमार्ग म्हणून समाविष्ट करण्यात आले असून या मार्गाला राज्य मार्ग क्र.४०४ हा क्रमांक देण्यात आला आहे.
या रस्त्यामुळे वाई बाजार, सारखणी सर्कल मधील अनेक गावांतील नागरिकांना विदर्भातील आर्णी बाजारपेठेला ये-जा करण्यास अंतर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून विदर्भातील राणीधानरा अंजनखेड, शारी, सेलू, सेंदूरसनी व परिसरातील नागरिकांना माहूर या तीर्थक्षेत्रावर येथील साडेतीन शक्तीपीठापैकी एक रेणुकामाता, महासती अनुसया माता, दत्तप्रभू, सरकार सोनापीर बाबा, शेख फरीद बाबा व माहूर तीर्थक्षेत्रावरील इतर विविध अध्यात्मिक संस्कार केंद्रात ये-जा करण्यास अत्यंत सोयीचे होणार असल्याने परिसरातील नागरीकातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, कॉंग्रेस नेते नामदेवराव केशवे यांचे मराठवाडा – विदर्भातील जनतेतून आभार व्यक्त करण्यात येत आहे.