लाँकडाऊन ठरतोय विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशास बाधा?
संतोष रोकडे,अर्जुनी मोर
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळा अधिक व विद्यार्थी कमी अशी अवस्था पाहावयास मिळत आहे. दरवर्षी पाचवी ते आठवीच्या प्रवेशासाठी पालकांना व विद्यार्थ्यांना शिक्षक अनेक आमिषे देऊन पाल्यांचे प्रवेश करून घेतात, मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रवेशासाठी च्या रस्सीखेचीत बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे खाजगी शाळांच्या इयत्ता पाचवी व आठवीत विद्यार्थी भरती प्रक्रिया कशी राबवावी या विवंचनेत खाजगी शाळांचे व्यवस्थापन व शिक्षक सापडल्याचे चित्र अर्जुनी-मोर तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून येत आहे.
गोंदिया जिल्ह्यात खाजगी माध्यमिक विद्यालय यांची संख्या अधिक आहे. खाजगी प्राथमिक शाळांची संख्या जेमतेम आहे. शाळेच्या तुकड्या व शिक्षकांचे भवितव्य इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थी भरती प्रक्रियेवर अवलंबून असते, त्यामुळे संस्थाचालकांचा सह गुरुजन इयत्ता चौथी च्या परीक्षेनंतर इयत्ता पाचवीच्या प्रवेश नियोजनात व्यस्त असतात. गुरुजी पालकांच्या घरी जाऊन पालक व विद्यार्थी यांना अनेक आमिषे देऊन त्यामध्ये कपडे सायकल शिक्षणाचे साहित्य देऊन पालक व विद्यार्थी यांची मनधरणी करून विद्यार्थी आपल्यात शाळेत कसा प्रवेश करेल याकडे लक्ष देऊन असतात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा प्रत्येक गावात आहेत. या शाळेतील इयत्ता चौथी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपल्या शाळेत प्रवेशित करण्यासाठी गुरुजनांचा खटाटोप सुरू असतो, एक मे नंतर हा कार्यक्रम सुरु होतो. भर उन्हात गुरुजीची रपेट पालकांच्या घरी सुरू होते. गणवेश,सायकल,शिक्षण साहित्य, अशी विविध प्रलोभने विद्यार्थी व त्यांच्या पालकांना देऊन आमच्यात शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश करा अशी आळवणी सुरु होते. ज्या गावात दोन किंवा त्यापेक्षा अधिक माध्यमिक विद्यालय आहेत तेथे अधिकच रस्सीखेच असते. यापूर्वी काही गावात हमरीतुमरी होऊन प्रकरण हातघाईवर गेल्याचे दिसून आले आहेत. हे गुरुजन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांच्या संपर्कात असतात त्यांनी पालकांची मनधरणी करून प्रवेश करण्यास मदत केली तर त्यांनाही फुल ना फुलाची पाकळी बक्षीस म्हणून दिली जाते. यावर्षी इयत्ता चौथी व इयत्ता आठवीची परीक्षा कोरोना विषाणूंच्या संसर्ग भीतीपोटी शासनाने रद्द करून त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे घोषित केले. आता या प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र केव्हा देतात या प्रतीक्षेत माध्यमिक शाळांचे शिक्षक मंडळी यांचे लक्ष आहे. तोवर लाँकडाऊन असले तरी विद्यार्थ्यांच्या पालकांचे भ्रमणध्वनी क्रमांक मिळवून त्यांची मनधरणी सुरू असल्याचे दिसून येत आहे. सध्या 30 एप्रिल पर्यंत लाँकडाऊन असल्याने तो समाप्त होण्याची प्रतीक्षा शाळांना आहे.