कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मोठा बदल; यंदा १ नोव्हेंबर ते २९ ऑगस्ट
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार प्रथम वर्षासाठी १ नोव्हेंबर २०२० ते २९ आॅगस्ट २०२१ असे शैक्षणिक वर्ष असणार आहे. त्यात दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी केल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बारावीच्या निकालासह महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यावर परिणाम झाला.
विद्यापीठ अनुदान आयोगाने यापूर्वी दोन वेळा शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे शक्य झाले नाही. परंतु, आता यूजीसीने नवीन शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ३१ आॅक्टोबरपर्यंत प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पहिले सत्र १ नोव्हेंबरपासून ४ एप्रिलपर्यंत पूर्ण करावे लागेल. दुसरे सत्र ५ एप्रिलपासून २९ आॅगस्टपर्यंत असेल, असे यूजीसीतर्फे स्पष्ट केले आहे.
यूजीसीचे शैक्षणिक वेळापत्रक
प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे : ३० आॅक्टोबर २०२०
शैक्षणिक वर्ष व प्रथम वर्षाचे वर्ग सुरू करणे : १ नोव्हेंबर २०२०
परीक्षेच्या तयारीसाठी सुट्टी : १ मार्च ते ७ मार्च २०२१
परिक्षांचे आयोजन करणे : ८ मार्च ते २७ मार्च २०२१
पहिल्या सत्रासाठी सुट्टी : २७ मार्च ते ४ एप्रिल २०२१
दुसऱ्या सत्राला सुरुवात : ५ एप्रिल २०२१
परीक्षेच्या तयारीसाठी सुट्टी : १ आॅगस्ट ते ८ आॅगस्ट
दुसºया सत्रातील परीक्षांचे आयोजन : ९ आॅगस्ट ते २१ आॅगस्ट
पुढील नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात : ३० आॅगस्ट २०२१