तीसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून पुर्वतयारीला लागा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कोविड टास्क फोर्सला सूचना ; 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील युवक-युवतींचे लसीकरण ; 10 जानेवारी पासून बुस्टर डोज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 31 :- मुंबई तसेच राज्यातील इतर शहरात व राज्याबाहेर ओमिक्रॉनचे बाधीतांची संख्या वेगाने वाढत आहे. यवतमाळमध्ये देखील रूग्ण संख्या वाढून तीसरी लाट येण्याची नाकारता येत नाही. कोरोनावर सध्या लस हाच एकमेव पर्याय उपलब्ध असून कोरोना लस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका कमी असल्याचे आतापर्यंतच्या विविध निष्कर्षातून समोर आलेले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षीततेसाठी व तीसऱ्या लाटेपासून बचावासाठी सतर्क राहून सातत्याने मोठ्या प्रमाणात सर्वांचे लसिकरण करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस चव्हाण, डॉ. रमा बाजोरिया, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ तागडपल्लीवर, शिक्षणाधिकारी शिवानंद गुंडे, वा.पु.डायरे, वंदना येडस्कर तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की लसच्या दुसऱ्या डोज साठी पात्र होणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील दररोज वाढत जाणार आहे. ज्यांनी अद्यापही दुसरा डोस घेतला नाही तसेच येणाऱ्या दिवसात जे नागरिक दुसऱ्या डोस साठी पात्र ठरणार आहेत त्यांचेपर्यंत ग्रामस्तरीय टीमने पोहचून त्यांना लस घेण्यास उद्युक्त करावे तसेच शक्य तेथे घरोघरी जावून प्राधाण्याने दुसरा डोज देण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
15 ते 18 वयोगटातील युवक, युवतींचे लसीकरण
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 जानेवारी पासून 15 ते 18 वयोगटातील युवक, युवतींना कोव्हॅक्सीन ही कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात या वयोगटात अंदाजे 1 लाख 48 हजार इतक्या युवक युवतींची संख्या असून यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्याच्याही सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये यांची निश्चिती करून त्या ठिकाणी फक्त 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठीच लसीकरण कक्ष सुरू करण्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर लस घेतलेल्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना सुटी जाहिर करण्याच्याही सूचना त्यांनी शिक्षण विभागाला दिल्या.
बुस्टर डोज
दोन डोस घेतलेल्या हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर व 60 वर्षावरील सहव्याधीग्रस्त नागरिकांना 10 जानेवारी पासून बुस्टर डोज देण्यात येणार आहे. दुसऱ्या डोजनंतर 9 महिने किंवा 39 आठवडे पुर्ण झालेल्या लाभार्थींना बुस्टर डोजसाठी कोविन ॲपवर नोंदणी करता येणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी 50 टक्के पेक्षा जास्त लसीकरण कमी असलेल्या गावांवर अधिकचे लक्ष केंद्र करण्यात आले असून या गावांमध्ये जानेवारी 2022 मध्ये विशेष लसीकरण अभियान राबविण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कार्य करत आहे. त्याचबरोबर हर घर दस्तक या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबात जावून लसीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले. नागरिकानीही लसीकरणास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्ह्यामध्ये लसीकरणासाठी 22 लाख 28 हजार 500 पात्र नागरिकांपैकी 17 लाख 6 हजार 95 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर 9 लाख 37 हजार 368 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पहिल्या डोजची टक्केवारी 76.56 असून दुसऱ्या डोज घेणाऱ्यांची टक्केवारी 42.38 असल्याची माहिती जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी दिली. जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणाची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी सादर केली.
बैठकीला जिल्हा व तालुका कोरोना टास्क फोर्सचे संबंधीत अधिकारी उपस्थित होते.