ओमिक्रॉनच संकट ; राज्यसरकार सतर्क संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्र्यांची आरोग्यमंत्री व टास्क फोर्स सोबत बैठक…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दक्षिण आफ्रिकेत (South Africa) आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने (Corona New Variant ) जगभरात खळबळ माजवली आहे.
या नव्या व्हेरियंटने अनेक देश चिंतेत पडले असून सावधानी म्हणून सर्व देश सतर्क झाले आहेत. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध पावले उचलली जात आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या विषाणूमुळे जगभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चिंता वाढली आहे. कारण हा नविन विषाणू डेल्टाप्लस पेक्षा अधिक भयंकर असल्याची चिंता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर भारत सरकार संरक्षणात्मक पावले उचलत आहे. महारष्ट्रातील राज्य सरकारही सतर्क झाले असून विषाणूच्या या नव्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ, नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून दक्षिण आफ्रिकेतून सुरू असणाऱ्या विमान सेवेवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना परिस्थिती आणि नव्या व्हेरियंट बाबत करण्यात आलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला होता. आफ्रिका खंडातील इतर देशांमध्येही कोरोनाच्या या नव्या विषाणूचा संसर्ग फैलावला आहे. बोत्सवानामध्ये या नव्या व्हेरियंटचे 32 म्युटेशन आढळले आहेत. हा व्हेरिएंट अधिक वेगाने फैलावत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील विमान उड्डाणांवर बंदी घालण्याचा केंद्र आणि राज्य सरकार विचार करत आहे. तर, येत्या 3 डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावरही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या कसोटी सामन्यात 50 टक्केच प्रेक्षक क्षमता केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईन करणार
नव्या व्हेरियंटसोबत लढण्यासाठी आता मुंबई महापालिका सज्ज होत असून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या काल झालेल्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता 14 दिवस क्वॉरंटाईन केलं जाणार असून त्यांची दर 48 तासांनी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान, दक्षिण अफ्रिकेची विमानसेवा बंद करण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने गेल्या 14 दिवसांत आफ्रिकेतील कोणत्या देशाचा दौरा केला असेल तर त्याचीही तपासणी केली जाणार आहे. याचप्रमाणे मुंबईतील जंबो कोव्हिज सेंटरचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित आढळल्यास संबंधित इमारत सील
मुंबई महापालिकेने ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित आढळल्यास संबंधित इमारत सील करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.