जिल्हाधिकारी यांची विविध तालुक्यातील लसीकरण सत्राला भेटी ; कळंब, राळेगाव, मारेगाव,पांढरकवडा व वणी तालुक्यात भेट व लसिकरणाचा आढावा ; मतदार पुनरिक्षण कार्यक्रमाची सांगड कोविड लसीकरणाशी ; प्रारूप मतदार यादीतून लसीकरण बाकी असणा-यांची नावे शोधून त्यांचे लसीकरणासाठी प्रबोधन ; आय.एम.ए. व निमा संघटनेतील सदस्य त्यांच्या क्लिनीकमध्ये शासनाच्यावतीने देणार कोविड लस…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 27 नोव्हेंबर : जिल्ह्यात 65 टक्के नागरिकांनी कोविड लसचा पहिला डोस घेतला आहे, उर्वरित 35 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण करण्याकरिता आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध तालुक्याला भेटी देऊन सर्व तालुका स्तरीय यंत्रणेला 10 डिसेंबर पर्यंत पहिल्या डोजचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांचे समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ सुहास कोरे यांनी कळंब, राळेगाव, मारेगाव,पांढरकवडा व वणी तालुक्यातील घोटी, तापेश्वर, आपटी, वडकी, शांतीनगर, करंजी, सोनूर्ली, साराटी, खडकी बु., लालगुडा, गणेशपूर या गावाना भेटी दिल्या व लसीकरण बाबत आढावा घेतला .
राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा प्रशासनाद्वारे सध्या मतदार यादीचे संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेत प्रारुप मतदार यादी सर्व ग्राम पंचायतींना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या ग्राम पंचायतीमध्ये ग्रामसेवकांनी ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती सदस्यांच्या सहाय्याने यादीमध्ये लसीकरण बाकी असणा-यांची नावे शोधून त्यांचे लसीकरणासाठी प्रबोधन करावे व त्यांचेसाठी लसीकरण सत्राचे नियोजन करावयाचे आहे. तसेच ज्यांचे लसीकरण झाले आहे परंतु डेटा एंट्री बाकी आहे, त्यांची डेटा एंट्री तात्काळ करण्याबाबत कार्यवाही करायची आहे. यासोबतच 18 वर्ष पूर्ण झालेल्या व लसीकरणासाठी पात्र असलेल्या किंवा लसीकरणाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची नावे मतदार यादीत नसल्याचे निदर्शनास आल्यास बी.एल.ओ. मार्फत मतदार यादीमध्ये नावे नोंदविण्यासाठी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. ही कार्यवाही शनिवारपासून पुढील तीन दिवसात मोहीम स्वरुपात सर्व तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी पूर्ण करुन घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी यांनी काल आय.एम.ए. व निमा च्या पदाधिकाऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे चर्चा केली. दोन्ही संघटनेतील सदस्य डॉक्टरांनी त्यांच्या क्लिनीकमध्ये येणाऱ्या नागरिकांचे कोविड लसिकरणासाठी प्रबोधन करावे व लसटोचकांमार्फत त्यांना लस द्यावी या जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर त्यांनी सोमवार 29 नोव्हेंबरपासून लसटोचक म्हणून शासनाला सहकार्य देण्याचे मान्य केले आहे.
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार विवेक पांडे, सुनील चव्हाण, गटविकास अधिकारी राजेश गायणार, सुरेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गोपाळ पाटील, डॉ मनीष सळूकर, डॉ अर्चना देठे, डॉ ए. ए शिंदे, डॉ संजय मडावी तसेच संबंधीत उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.