दोन वर्ष महाविकास आघाडीचे आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचे ; आरोग्य यंत्रणा बळकटीकरणात अग्रेसर यवतमाळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- राज्यात दोन वर्षापुर्वी महाविकास आघाडीचे शासन सत्तेत आल्यानंतर नवीन विकास कामे सुरू होण्यापुर्वीच कोरोनामुळे अनेक निर्बंध देखील आले. मागील दोन वर्षात कोविड -19 विषाणूने घातलेला धुमाकूळ आपण पाहिला. या आजारामुळे हजारोंच्या संख्येने माणसं मृत्युमुखी पडली, अनेक कुटुंबीय त्यांची जवळची माणसे या काळात गमावून बसली. मोठ्या प्रमाणात आर्थीक हानी झाली. या आपत्तीत आरोग्य व्यवस्थेचे महत्व आणि बळकटीकरणाची गरज समोर आली. यात कोरोना निर्बंधामुळे व्यापार उद्योग मंदावून शासनाची आर्थीक आवक देखील थांबलेली असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र कधी थांबला नाही व थांबणारही नाही’ असा विश्वास प्रकट करत राज्याच्या आर्थीक चक्राला गती दिली. आरोग्य व्यस्थेवर जिल्ह्याच्या व राज्याच्या उत्पनातुन अधिकाधिक खर्चासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.
कोरोना रोखण्यासाठी पहिल्या वर्षात विविध स्तरावर उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली. मात्र दुसऱ्या लाटेत शहरी व ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढली. उपचारासाठी सर्वांनी शहराकडे धाव घेतली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड भार आला. त्यावेळी शासकीय यंत्रणेने खाजगी हॉस्पीटल अधिग्रहीत करून नागरिकांना अधिक उपचाराच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. आता तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून जिल्हा प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नाने शहरी व ग्रामीण यंत्रणा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात शहरी व ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन साठवणूक प्लॅन्टची व्यवस्था करण्यासोबतच बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला. लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून व्हेंटिलेटर, ऑक्सीजनसाठा व अन्य आरोग्य उपकरणांची व्यवस्था करण्यात आली. परिणामी सध्या यवतमाळ जिल्ह्यात बेड्सची संख्या व ऑक्सिजनची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे.
वर्ष 2020 मध्ये पहिल्या लाटेच्यावेळी कोरोना उपचारासाठी अत्यल्प असलेल्या खाजगी रुग्णालयाची संख्या 2021 मध्ये 34 पर्यंत वाढवून 80 आय.सी.यु., 660 ऑक्सीजन व 224 सर्वसाधारण असे एकूण 1176 खाजगी बेड रूग्णसेवेसाठी अधिग्रहीत करण्यात आले. याचवेळी शासकीय वैद्यकीय रूग्णालय, समर्पित कोविड आरोग्य केंद्र व कोविड केअर सेंटरवरील 50 केंद्रावर 292 आय.सि.यु., 651 ऑक्सीजन व 3335 सर्वसाधारण असे एकूण 84 केंद्रावर 372 आय.सि.यु., 1311 ऑक्सीजन व 3559 सर्वसाधारण असे एकूण 5242 बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय रूग्णालयात लहान मुलांसाठी वेगळा कोविड वार्ड तयार करण्यात आला आला. नव्याने बांधण्यात येत असलेल्या स्त्री-रूग्णालय व इतर ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णांसाठी बेडची क्षमता वाढ करण्यात येत आहे.
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या वेळी 22 मे. टन ऑक्सीजनचा वापर करण्यात आला होता. तिसऱ्या लाटेची पुर्वतयारी म्हणून जिल्ह्यात 97.35 मे. टन ऑक्सीजन साठवणूक करण्यात आली असून त्याव्यतिरिक्त येत्या काही दिवसात 21.95 मे. टन ऑक्सीजन साठवणूकीची क्षमता निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारताच सर्वप्रथम यवतमाळ जिल्ह्यासाठी नवीन ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यास पुढाकार घेतला. आज प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाल्या आहेत.
सध्या कोरोनावर लस हा एकमेव उपाय आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 14 लाख 75 हजार नागरिकांनी लसचा पहिला डोज घेतला आहे तर 6 लाख 65 हजार नागरिकांनी दोन्ही डोज घेतले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सध्या कमी दिसत असले, तरी अद्याप आपला जिल्हा कोरोनामुक्त झालेला नाही. कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळ्या तालुक्यात अजूनही रुग्ण आढळून येत आहे. तसेच देश-परदेशात कोरोना विषाणू आपले रूप पालटून अधिक सशक्त झाल्याच्या बातम्या येत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे. कोरोना विषाणूपासून आपल्याला बाधा होऊ नये म्हणून लस घेणे आवश्यक आहे. भारतात आतापर्यंत एक कोटी वीस लाखपेक्षा अधिक डोज नागरिकांना देण्यात आले आहे. लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाही, ती पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्यांनी अद्यापही कोविडची लस घेतली नाही, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी, व ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांनीदेखील दुसरा डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करावे.
पालकमंत्री संदिपान भुमरे व जिल्हाधिकारी अमोल येडगे आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासोबतच सर्वांच्या लसिकरणासाठी आग्रही असून प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषदेद्वारे कायाकल्प योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील पायाभूत सुविधा अद्यावत करण्यात येत आहेत.
तिसरी लाट थोपवून धरण्यासाठी लोकसहभागासह सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करण्याची गरज आहे. कोरोना विषाणूपासून स्वतःला वाचविण्यासाठी शासनाने जे सुरक्षिततेचे नियम घालून दिले आहेत ते पाळणे गरजेचे आहे. जिवापेक्षा मोठे काही नाही, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. सध्या कोरोनावर लस हा एकमेव उपाय आहे त्यामुळे आपण लस घ्यावी व आपल्या परिवारातील सदस्य, मित्रमंडळी यांनादेखील लस घ्यायला लावून सर्वांना सुरक्षित करून घ्यावे….
गजानन जाधव , माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ….