7 ऑक्टोबर पासून धार्मीक स्थळे सुरू करण्यास परवानगी ; ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना लागू…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 6 ऑक्टोबर :- जिल्ह्यात बंद असलेली सर्व प्रकारची धार्मीक स्थळे व प्रार्थनास्थळे दिनांक 7 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असून यासंदर्भात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एका आदेशान्वये सुधारित मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत.
मार्गदर्शक सूचनांनुसार कोवीड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी सावधगिरीची उपाययोजना म्हणून प्रतिबंधीत क्षेत्रातील धार्मिक स्थळे / प्रार्थनास्थळे बंद राहतील. ६५ वर्षावरील वयाची व्यक्ती, जटील रोग/व्याधीग्रस्त असलेल्या व्यक्ती, गर्भवती महिला आणि १० वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. धार्मिक संस्था व व्यवस्थापन समिती यांनी सदर उपाययोजनांचे अधिन राहुन कामे करणे आवश्यक आहे. सबब प्रतिबंधात्मक उपाययोजना समवेत सर्वसाधारण सार्वजनिक आरोग्याचे दृष्टीने हितप्राय उपायोजननांचा अवलंब करणे गरजेचे आहे. जेणेकरुन कोरोनाचे अनुषंगाने धोका टाळणे शक्य होईल,
या दरम्यान पुढील बाबी व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सर्व व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी किमान ६ फुटाचे अंतर राखावे. फेस कव्हर /मास्कचा वापर अनिवार्य असेल. साबणाचे/ सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करणे अनिवार्य आहे. खोकतांना आणि शिंकतांना तोंड आणि नाक रुमाल /टिश्यू /हाताच्या कोपराने झाकावे. वापरलेल्या टिश्युंची विल्हेवाट योग्य पध्दतीने करावी. सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची देखरेख करणे गरजेचे आहे. कोणतीही लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा तसेच राज्य व जिल्हा हेल्पलाईन क्रमांकावर सदर बाबत सुचना द्यावी.थुंकण्यास सक्त मनाई असेल. थुकणा-यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य सेतु अॅपचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सार्वजनिक स्थळे /संस्था यांनी प्रवेशव्दारावर हाताची स्वच्छता करण्यास्तव सॅनिटायझर डिस्पेंसर / साबण-पाणी आणि थर्मल स्क्रीनिंग ( तापमापक) यांची व्यवस्था करण्यात यावी. केवळ लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच परिसरात परवानगी असेल. केवळ फेस कव्हर /मास्कने तोंड व नाक पुर्णपणे झाकलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा. कोवीड-१९ बद्दल प्रतिबंधात्मक उपायांची पोस्टर्स/स्टॅडीज ठळकपणे दर्शनी भागात लावण्यात याव्यात कोवीड-१९ साठी प्रतिबंधात्मक उपायांविषयी जागरुकता निर्माण होण्यास्तव चलचित्र /दृकश्राव्य फित सर्व प्रार्थनास्थळावर नियमितपणे आवश्यकतेनुरुप वाजविण्याची कार्यवाही करण्यात यावी. धार्मिक स्थळांचे क्षेत्रफळ संरचना, वायुविजन इत्यादी घटकांच्या आधारे एका वेळी प्रवेश देण्यात येणा-या व्यक्तींची संख्या निर्धारीत करता येईल. याबाबतचा निर्णय / नियोजन धार्मिक स्थळे / संस्था, स्थानिक प्राधिकारी यांनी चर्चा करुन घ्यावा. चप्पल, जोडे शक्यतो स्वतःच्या वाहनातच उतरवावीत / ठेवावीत. गरज पडल्यास प्रत्येक व्यक्ती कुटुंबासाठी पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी. वाहनतळ, धार्मिक स्थळाचे बाहेरील जागा/ प्रवेशव्दारे येथे गर्दीचे योग्य नियोजन करण्यात यावे. धार्मिक स्थळे /संस्थाचे आवारातील दुकाने, आस्थापना, उपहारगृह टप-या इ. स्थळी सामाजिक अंतराचे पालन होईल या अनुषंगाने उपाययोजना करण्यात याव्यात. दर्शनाच्या रांगा व धार्मिक स्थळे येथे सुरक्षीत अंतर गर्दीचे व्यवस्थापन होणेस्तव आवश्यक खुणा रेखाटण्यात याव्यात अभ्यागतांसाठी शक्यतो स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन मार्ग नियोजित करण्यात यावे. प्रवेशासाठी रांगेत उभे असतांना प्रत्येक वेळी किमान ६ फुट शारीरिक अंतर ठेवणे अनिवार्य असेल सदर बाबींकरीता धार्मिक स्थळ / संस्था व्यवस्थापन जबाबदार असेल. लोकांनी आवारात प्रवेश करण्यापुर्वी हात आणि पाय साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवावेत. पुरेसे सामाजिक अंतर राखले जाईल याअनुषंगाने बैठक व्यवस्था करण्यात यावी. वातानुकुलन व वायुविज मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल याची संबंधित धार्मीक स्थळ व्यवस्थापनाने दक्षता घ्यावी. धार्मिक स्थळावर असलेली मुर्ती /पवित्र पुस्तके इत्यादींना स्पर्श करण्याची परवानगी नसेल.
मोठ्या संमेलनास/परिषदांवर बंदी कायम राहिल. संक्रमणाचा प्रसार होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, कमीत कमी रेकॉर्ड केलेले भक्ती संगीत/ गाणी वाजविण्यात यावी तसचे गायन किंवा गायन गटांना परवानगी राहणार नाही, एकमेकांना शुभेच्छा देताना / भेटतांना शारीरिक संपर्क टाळावा, प्रार्थना करतांना सार्वजनिक चटई टाळावी आणि भक्तांनी स्वतःची चटई आणावी. प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे, तिर्थ वाटप करणे ईत्यादी बाबींना परवानगी असणार नाही. शौचालये/ स्वच्छतागृहांची विशेष दक्षता घेण्यात यावी. धार्मिक स्थळांचे नियमित निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही संबंधीत व्यवस्थापानाने करावी. फरशी / तळजमिन नियमित निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही सबंधित व्यवस्थापनाने करावी. अभ्यागतांनी किंवा कर्मचा-यांनी वापरलेल्या फेस कव्हर मास्क हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावण्यास्तव विशेष व्यवस्था करण्यात यावी.
धार्मिक स्थळी काम करणा-या व्यक्तींनी कर्मचा-यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे
पालन करणे अनिवार्य आहे. तसेच बहु संपर्क होणा-या व्यक्तींनी / कर्मचा-यांनी त्यांची साप्ताहीक कोविड चाचणी करुन घेणे गरजेचे आहे. शौचालय तसेच खाण्याच्या ठिकाणची गर्दी टाळावी, स्थानिक प्राधिकरण, पोलीस व जिल्हा प्रशासन यांचे निर्देशाचे अनुषंगाने प्रवेश संख्या, जागा व अंतर इत्यादी बाबतचे नियोजन करण्याची कार्यवाही संबंधित धार्मिक स्थळांनी करावी.
जर धार्मिक स्थळाच्या आवारात संशयीत किंवा संसर्गित रुग्ण आढळला तर पुढिलप्रमाणे कार्यवाही करावी. संबंधीत व्यक्तीचे तातडीने विलगीकरण करण्यात यावे, डॉक्टर व इतर तज्ञ यांचेव्दारे परिक्षण होईपर्यंत संबंधित व्यक्ती मास्क पुर्णवेळ घालुन राहतील याची दक्षता घ्यावी. जवळच्या वैद्यकीय सुविधा ( रुग्णालय ) यांना तात्काळ कळवावे, नामांकित सार्वजनिक आरोग्य प्राधिकरण ( जिल्हा आरआरटी / उपचार करणारे चिकित्सक) यांचे व्दारे जोखमीचे मुल्याकन केले जाईल आणि प्रकरणाचे व्यवस्थापन, त्याचे संपर्क निर्जंतुकीकरणाची गरज यासंदर्भात पुढील कार्यवाही सुरु केली जाईल, संसर्गीत व्यक्ती आढळल्यास संपुर्ण परिसराचे तात्काळ निर्जंतुकीकरण करावे.
सदर आदेशात नमुद संपुर्ण निर्देशांचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्यक कायदेशिर व दंडात्मक कारवाई करण्यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्यात येत आहे. नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रात नगरपरिषद/नगरपंचायत व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत. गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागांचे संयुक्त पथक गठीत करावेत.
उपरोक्त आदेशातील बाबींचा भंग झाल्याचे निदर्शनास येत असल्यास त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करावयाचा झाल्यास ज्या पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये असा गुन्हा घडला आहे त्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही अश्या अधिका-यांना गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
उपरोक्त आदेश दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२१ पासून पुढील आदेशापावेतो यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. उपरोक्त आदेशांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनिय, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम व भारतीय दंडसंहिता व इतर संबंधीत कायदे व नियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.