निकृष्ट शालेय पोषण आहार प्रकरणाचे चेंडू ‘पीआरसी’ च्या दरबारात! ; पालकांची तक्रार;प्रसंगी न्यायालयात जाणार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर,(प्रतिनिधी)
शालेय पोषण आहाराचा धान्य वाटप करणा-या कंत्राटदाराकडून सिलबंद पोत्यात बनवाबनवी करून वजनापेक्षा कमी तांदुळ,हरभरा व डाळ देवून शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मिलीभगत करून शालेय पोषण आहाराच्या नावाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पर्वा न करता त्यांच्या तोंडात पशुखाद्याचा घास भरवला जात होता.पालक वर्गाने शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर देखील कारवाई करणे तर दूरच परंतु पुरवठा करण्यात आलेले धान्य बदलून देण्याची तसदी घेण्यात आली नाही.शेवटी व्यथित होऊन पालकांनी माहूर तालुका दौऱ्यावर असलेल्या पीआरसीला प्रत्यक्ष भेटून दर्जाहीन धान्याच्या नमुन्या सहित विस्तृत निवेदन देवून कारवाईची मागणी केली आहे.
पीआरसी दौऱ्याच्या निमित्ताने माहूर शहरात रात्री उशिरा आलेले गट प्रमुख व सदस्यांनी माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी युवराज म्हैत्रे यांनी केलेल्या कार्याचे भरभरून कौतुक करून शाबासकीची थाप दिली.परंतु समितीला माहूर शहरात दाखल होण्यासाठी उशीर झाल्याने एकमेव माहूर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांना पुरवठा होणाऱ्या निकृष्ट शालेय पोषण आहाराची तक्रार पालकांनी धान्य व धान्य आदी नमुन्या सहित समिती सदस्यांना विश्रामगृहावर गाठून रात्री उशिरा साडे दहा वाजताच्या सुमारास देऊन माहूर या आदिवासी,अतिदुर्गम,बंजारा व आदिवासी बहुल तालुक्यात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने अतिशय निकृष्ट व दर्जाहीन धान्य शालेय पोषण आहार म्हणून पुरवठा केला जातो याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.धान्याचा दर्जा निकृष्ट तर आहेच सोबत मापात पाप करून कमी वजनाने धान्याचा पुरवठा केला जात असल्याची पालकांच्या स्वाक्षऱ्या असलेली रितसर तक्रार सादर केली.तक्रारीचे गांभीर्य लक्षात येताच समिती सदस्यांनी सचिवाला तातडीने कारवाई करण्याच्या सक्त सूचना केल्या शिवाय धान्याचे नमुने व निवेदन आपल्या स्वतःच्या बॅग मध्ये ठेवून घेतले व पालकांना या प्रकरणात सक्तीने कारवाई करणार असल्याचे आश्वासित केले.एकंदरीत या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षण विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून समितीने कारवाईचा बडगा उगारला तर टांगती तलवार कुणावर हा प्रश्न शिक्षण विभागामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.तर पालक वर्गाला समितीने दिलेल्या आश्वासना मुळे दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषद शाळांना पुरवठा केला जाणाऱ्या धान्य व धान्यादीच्या निकृष्ट ते संदर्भात तब्बल महिनाभरापासून पाठपुरावा केल्यानंतरही शिक्षण विभागाने संबंधित पुरवठा झाल्यावर कार्यवाही तर केलीच नाही शिवाय धान्य ही बदलून दिले नाही. त्यामुळे नाईलाजाने आज पीआरसी समोर हे प्रकरण मांडावे लागले.पोषण आहार पुरवठा कंत्राटदार हे राजकीय दृष्ट्या सक्षम असल्याने जर ही कार्यवाही मॅनेज झाली तर न्यायालयात दाद मागणार मात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार हा दर्जेदार मिळालाच पाहिजे ही आमची मागणी*.
नविद खान
पालक,वाई बाजार