माहूर नगर पंचायत निवडणुक रणधुमाळीची पूर्वतयारी सुरु ; विविध राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- माहूर नगरपंचायत ची मुदत डिसेंबर २०२१ मध्ये संपत असून निवडणुका वेळेतच घेण्याच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने पूर्वतयारीला सुरुवात केली असून नुकतेच राज्य निवडणूक आयोगामार्फत निवडणूक पूर्व तयारीच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. हि चाहूल लागताच विविध राजकीय पक्षातर्फे निवडणूक मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सुरक्षित प्रभागाच्या शोधात असून आरक्षण सोडतीकडे लक्ष लावून आहेत. १७ सदस्य असलेल्या माहूर नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ८ शिवसेना ४ कॉंग्रेस ३ भाजप १ व एमआयएम १ असे पक्षीय बलाबल असून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आघाडी सत्तेत आहे. गेल्या पाच वर्षात पहिल्या अडीच वर्षानंतर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकमेव सदस्य असलेल्या भाजपने त्यावेळी राज्यात भाजप सेनेची सता असल्यामुळे साम,दाम, दंड, भेद नीतीचा अवलंब करून केवळ सत्ताकारण हेच धेय्य ठेऊन एमआयम व काही राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या फितुरांना हाताशी धरून रंगत आणून नगरपंचायत खेचून आणण्याचे प्रयत्न केले. परंतु एमआयएमने भाजप-शिवसेनेला साथ दिली असतांना ईश्वरचिट्ठीने मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस च्या नगराध्यक्ष कु.शीतल जाधव व उपनगराध्यक्ष सौ.अश्विनी आनंद पाटील तुपदाळे यांना तारल्याने भाजप शिवसेनेचे प्रयत्न निष्फळ ठरले होते. यावेळी एका प्रभागात अनेक सदस्य निवड प्रक्रिया होणार नसल्याने संघटीतपणे निवडणूक लढवून फायदा घेण्याच्या बेतात असणाऱ्याना एक प्रभाग एक सदस्य पद्धतीने निवडणूक होणार असल्याने प्रत्येक उमेदवाराला पक्षाच्या साथ सोबतच स्वतःच्या बळावर निवडणूक लढवावी लागणार आहे.
नंतरच्या काळात राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदीप नाईक यांचा पराभव करून भाजपा शिवसंग्रामचे आ.भीमराव केराम निवडून आले. परंतु बदललेल्या राजकीय स्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्र पक्षाचे महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आले असल्याने मतदार संघात आमदार भाजपचे जरी असले तरी राज्यातील सत्तेच्या प्रभावाने महाविकास आघाडीतील घटक पक्षही पावरफुल बनले असल्याने माहे डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता असणारी माहूर न.प. ची निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्टवादी कॉंग्रेसतर्फे माजी जि.प. उपाध्यक्ष तथा जि.प. सदस्य समाधान जाधव तालुकाध्यक्ष मेघराज जाधव व माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी,युवा नेते वेदांत जाधव, कॉंग्रेसकडून ना.जि.म.स.बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष, प्राचार्य राजेंद्र केशवे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष जि.प. सदस्य संजय राठोड, शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे, किशन राठोड, तर भाजपातर्फे मुंबईहून विधिज्ञ रमण जायभाये, माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी, तालुकाध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, सुमित राठोड, शहराध्यक्ष गोपू महामुने, तर शिवसेनेकडून उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे, तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, शहरप्रमुख निरधारी जाधव, युवा नेते यश खराटे माहूर न.प.च्या रणनीतीकडे लक्ष ठेऊन असून प्रभावी उमेदवाराचे शोधकार्यास प्रारंभ केला असल्याचे दिसत आहे. वंचित बहुजन आघाडी, मनसे, एमआयएम,प्रहार जनशक्ती, संभाजी ब्रिगेड, गोर सेना सह इतर पक्षही सर्वसामान्य कार्यकर्त्याना संधी देऊन चमत्कार घडविण्याचे मनसुबे बाळगून असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्षातर्फे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याचे सुतोवाच होत असल्याने गतवेळे प्रमाणेच याही निवडणुकीत सर्व पक्ष वेगवेगळे लढणार असल्याची शक्यता असून भाजपाचे आमदार भीमराव केराम राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हा गड खेचून माहूर न.प. वर भाजपाचा झेंडा फडकविण्यात यशस्वी होणार की, माजी आमदार प्रदीप नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड राखण्यात यशस्वी होणार की, वेगवेगळ्या निवडणुका लढवून महाविकास आघाडीचा झेंडा माहूर न.प.वर फडकणार की तिसरी आघाडी चमत्कार घडविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.