लढवय्या साहित्यिक हरपला..! ज्येष्ठ कवी माधव पवार यांचं निधन, तब्बल 1650 डायलिसिसचा टप्पा केला होता पूर्ण….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
सोलापूर :- “सोलापूरचे ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार यांचं निधन झालं आहे. आपल्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झालं. गेल्या १२-१३ वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते.
या अत्यंत कठीण काळात त्यांनी तब्बल १ हजार ६५० डायलिसिसचा टप्पा पूर्ण करून जीवनाशी झुंज दिली होती. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी मोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
माधव पवार यांनी सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात वरिष्ठ लिपिक म्हणून ३५ वर्षे सेवा बजावली. आपल्या कार्यकाळात त्यांनी भांडारपाल, कोषागार, ओपीडी, स्त्री आणि प्रसुती शास्त्र आणि ॲनाटोमी अशा विविध विभागांमध्ये कार्यक्षमतेनं काम पाहिलं होतं. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार रा. ना. पवार यांचे चिरंजीव होते.
दोन काव्यसंग्रह प्रकाशित
साहित्याची ओढ असलेल्या माधव पवार यांचे ‘हे शुभशकुनांचे पक्षी’ आणि ‘गरूडभरारी’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या काव्यप्रतिभेची दखल घेत महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यासह राज्यस्तरावरील २१ मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. सोलापुरात संपन्न झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ‘स्वागत गीत’ लिहिण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. अनेक विभागीय आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांमधील कवी संमेलनं त्यांनी आपल्या कवितांनी गाजवली होती.
माधव पवार यांची गाणी अनेक गायकांनी गायली
कवी माधव पवार यांनी लिहिलेली गीते महाराष्ट्रातील नामवंत गायकांनी गायली आहेत. त्यांच्या गीतांच्या अनेक ऑडिओ कॅसेट आणि सीडी प्रकाशित झाल्या आहेत. सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, शकुंतला जाधव, जगदीश गोरसे, सुरेखा पुणेकर, बेला सुलाखे यांसारख्या दिग्गज गायकांनी त्यांच्या शब्दांना स्वरसाज चढवला आहे.
1650 डायलिसिसचा टप्पा केला होता पूर्ण
माधव पवार यांनी किडनीवर उपचार घेत असताना तब्बल १६५० वेळा डायलिसिसचा टप्पा पूर्ण केलं होतं. जगण्यासाठी त्यांचीही झुंज काही कमी नव्हती. साधारणपणे एखादा रुग्ण हा आठवड्यातून ३ वेळा डायलिसिस करत असतो. वर्षाला हा आकडा १५६ इतका होतो. माधव पवार यांनी हा टप्पा पूर्ण कऱण्यासाठी जवळपास १० ते ११ वर्ष लागली असेल. इतक्या दिवसांपासून ते उपचार घेत होते. इतक्या मोठ्या संख्येनं डायलिसिस पूर्ण करण्यासाठी खरंतर शारीरिक सहनशक्ती गरजेची असते. माधव पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….