भाजपाच्या मित्रपक्षात मोठी फूट? आमदारांनी दिले बंडाचे संकेत; नेमकं काय घडतंय..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवून भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही नुकताच पार पडला.
त्यादरम्यान भाजपाचा प्रमुख मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षात नाराजीचा सूर उफाळून आला आहे. उपेंद्र कुशवाहा यांच्या पुत्राला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने पक्षातील काही आमदारांनी थेट बंडाचा इशारा दिला आहे. कुशवाहा यांच्या पक्षात घराणेशाहीला अधिक बळ मिळत असल्याचा आरोप या आमदारांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
आमदारांनी स्नेहभोजनावर टाकला बहिष्कार
नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षाचे चार आमदार निवडून आले. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात पक्षाला एका मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. त्यादरम्यान कुशवाहा यांनी पक्षातील कोणत्याही आमदाराच्या नावाचा विचार न करता, थेट आपल्या पुत्राचे नाव मंत्रिपदासाठी सुचवले. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील आमदार नाराज असल्याचे सांगितले जात होते. बुधवारी ही नाराजी अधिकच उघडपणे दिसून आली. उपेंद्र कुशवाहा यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावर राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षातील तीन आमदारांनी बहिष्कार टाकला.
कोणकोणते आमदार नाराज असल्याची चर्चा?
दिनारा मतदारसंघाचे आमदार आलोक कुमार सिंह, बाजपट्टीचे आमदार रामेश्वर महतो व मधुनबनीचे आमदार माधव आनंद यांनी पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या तिन्ही आमदारांनी कार्यक्रमाला न जाता, थेट भाजपाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. या घडामोडीनंतर राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षात मोठी बंडखोरी होणार असल्याची चर्चा रंगली. भाजपाच्या नेत्याच्या भेटीनंतर आमदार माधव आनंद आणि रामेश्वर महतो दोघेही दिल्लीला रवाना झाले. दरम्यान, दोन्ही आमदार भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या चौथ्या आमदार खुद्द उपेंद्र कुशवाहा यांच्या पत्नी स्नेहलता कुशवाहा (सासाराम) आहेत. त्यामुळे उर्वरित सर्व आमदारांनी बंडाचा इशारा दिल्याने कुशवाहा यांची मोठी कोंडी झाली आहे.
नाराजीनाट्यानंतर आमदारांची भूमिका काय?
आमदार माधव आनंद यांनी उपेंद्र कुशवाहा यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. राजकारणात घराणेशाहीला प्रोत्साहन देणे हा आत्मघातकी निर्णय आहे. कुशवाहा हे राज्यसभेचे खासदार असून त्यांच्या पत्नी आमदार आहेत. यादरम्यान विधानसभेची निवडणूक न लढवूनही त्यांच्या पुत्राला थेट मंत्रिपद देण्यात आले आहे. कुशवाहा यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. आमच्या तिन्ही आमदारांचा या निर्णयाला उघडपणे विरोध आहे. परंतु, असे असले तरी आम्ही पक्षाला सोडचिठ्ठी देणार नाही. नितीन नवीन यांची भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, असे माधव आनंद यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे.
पक्षश्रेष्ठींनी विश्वासात न घेतल्याचा दावा
आमदार रामेश्वर महतो यांनीही दी इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना कुशवाहा यांना लक्ष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षाचे प्रमुख घराणेशाहीच्या राजकारणाचे कट्टर विरोधक होते; पण अचानक निवडणुकीनंतर त्यांना आपल्या भूमिकेचा विसर पडला. मुलाला मंत्रिपद देण्याआधी त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळेच माझ्यासह पक्षातील तीन आमदारांनी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहून त्यांचा निषेध केला, असे आमदार रामेश्वर महतो यांनी स्पष्ट केले आहे. यादरम्यान दी इंडियन एक्स्प्रेसने कुशवाहा यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आमदारांच्या गैरहजेरीचा मुद्दा अनावश्यकपणे मोठा करून दाखवला जात आहे. लवकरच सर्व काही सुरळीत होईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले.
कुशवाहा यांच्या पक्षात याआधीही बंडखोरी
उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षात बंडखोरी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही त्यांच्या पक्षातील आमदारांनी बंड करीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड पक्षात प्रवेश केला होता. विशेष बाब म्हणजे- मुलाला मंत्री केल्याच्या निषेधार्थ महिनाभरापूर्वीच पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र नाथ यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. यादरम्यान आमदारांची नाराजी ही राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षातील अंतर्गत समस्या असल्याचे सांगून, त्याला कोणी राजकीय रंग देऊ नये, अशी भूमिका भाजपातील एका ज्येष्ठ नेत्याने मांडली आहे. दुसरीकडे- कुशवाहा यांनी आपला पक्ष एकत्र कसा ठेवायचा हे हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे प्रमुख जितनराम मांझी यांच्याकडून शिकावे, असा टोला जदयूच्या नेत्याने लगावला आहे.
आमदारांच्या नाराजीचे मूळ कारण काय?
राष्ट्रीय लोक मोर्चात बंडखोरी उफाळण्याचे कारण जितनराम मांझी यांनी घेतलेली भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागा येत्या सहा महिन्यांत रिक्त होणार आहेत. या जागांसाठी मांझी यांनी आतापासूनच आपली मागणी तीव्र केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली असून, भाजपानंतर आमचा क्रमांक लागतो. पाच राज्यसभा जागांपैकी जदयू आणि भाजपाला प्रत्येकी दोन जागा मिळतील; तर पाचव्या जागेसाठी चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पार्टीचा दावा असेल. त्यामुळेच आम्हालाही केंद्र आणि राज्यातील मंत्रिपदाचा मोह सोडून राज्यसभेचा विचार करावा लागेल, असे जितनराम मांझी यांनी म्हटले आहे. त्यांनी राज्यसभेसाठी कुशवाहा यांच्या पक्षाचे नाव घेणे टाळल्यामुळेच पक्षातील आमदार नाराज झाल्याचे सांगितले जात आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….