पावसाचा जोर उद्याही कायम राहणार; मुंबईसह 4 जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राजधानी मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, विविध जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून मुंबईसह उपनगर आणि ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुंबईतील रस्ते जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना (School) 2 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज आणि उद्या अशी दोन दिवस सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना जिल्ह्यात सुट्टी देण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याकडून उद्या मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात येत आहे. दरम्यान, काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही बीएमसी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
नवी मुंबईतील सर्व शाळांना देखील मुसळधार पावसामुळे उद्या 19 तारखेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिका आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आल्याचे परिपत्रक महापालिकेच्या शिक्षण विभागाने काढले आहे. यासह, ठाणे आणि नवी मुंबईतही आज आणि उद्या देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासह, रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्याने जिल्हाधिकारी महोदयांनी 19 ऑगस्ट रोजी शाळांना सु्ट्टी जाहीर केली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी उद्या सुद्धा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
रायगड जिल्ह्यात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रोहा आणि महाड तालुक्याला बसला आहे. रोहा तालुक्यातल्या आंबा आणि कुंडलिका तर महाडमधील सावित्री नदीने धोका पातळी ओलांडून काही भागात पूर परिपरीस्थिती निर्माण केली. त्यामुळे छोट्या-मोठ्या उपनद्यांना देखील पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. म्हसळा दिघी मार्गावर देखील पाणी आल्यामुळे त्या रस्त्यावरची वाहतूक ठप्प पडली होती. नागोठणे रोहाला जोडणाऱ्या भिसे खिंडित सुद्धा काही प्रमाणात दरड आल्याने हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आलाय. दिवसभरात एकूण 112.23 मिमि पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस 160 मिमि रोहा तालुक्यात झाल्याची नोंद करण्यात आहे. त्यामुळे कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली आहे.अजूनही मुंबई गोवा महामार्गावर धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे.
आदित्य ठाकरेंचं ट्विट, बीएमसीला टोला, शिंदेंवर निशाणा
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला जात आहे. ह्या पार्श्वभूमीवर मी मुंबई महापालिकेकडून अपेक्षा करतो की त्यांनी काही गोष्टी स्पष्ट कराव्यात.
• किती पंप कार्यरत केले गेले?
• किती पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने चालू होते?
• ह्यावर्षी किती नव्य ठिकाणी पाणी साचले आणि का?
अतिरिक्त आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष रस्त्यावर असायलाच हवं. गेल्या ३ वर्षांपासून मुंबई महानगरपालिका ही निवडून आलेल्या प्रतिनिधींशिवाय, थेट राज्य सरकारच्या ताब्यात आहे. पण निवडणुका नसणे म्हणजे जबाबदारी स्वीकारणारा कोणीही नसणे. मे महिन्यात केवळ 10 मिनिटांच्या सरींमध्ये अंधेरी सबवे आणि सीप्झ पाण्यात बुडाल्याचं आपण पहिले आहे. फेकनाथ मिंधे ह्यांच्या रस्ते घोटाळ्यामुळे मुंबईच्या रस्त्यांची आज दुरवस्था आहे. केवळ आपत्ती व्यवस्थापन कक्षातल्या भेटींचे फोटो टाकण्यात वेळ न घालवता, मुंबईकरांच्या खऱ्या प्रश्नांना महापालिका उत्तर देईल, असे ट्विट आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..