मुंबईत संध्याकाळी समुद्राला भरती, पुढील 12 तास महत्त्वाचे, पावसाच्या थैमानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबईत पुढील दोन दिवसात मोठा पाऊस होण्याची शक्यता असून लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. समुद्राला संध्याकाळी साडे सहा वाजल्यानंतर भरती येणार आहे, त्यामुळे पुढील 12 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबईतील पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट दिली. तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागिय आयुक्तांशी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. या या बैठकीला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.
संध्याकाळी भरती, नागरिकांनी काळजी घ्यावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबईत मागील 6 तासात 170 मिमी पाऊस झाला आहे. चेंबूरमध्ये 6 तासात सर्वाधिक 170 मिमी पाऊस झाला. 14 ठिकाणी वाहतूक धीम्या गतीनं होत आहे. पावसामुळे लोकल ट्रेन बंद झाल्या नाहीत, मात्र स्पीड कमी झाला आहे. ट्रेनलेट आहेत पण थांबल्या नाहीत.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पुढील 10 ते 12 तास तीव्र पाऊस मुंबईत होऊ शकतो. दुपारी 4 नंतर लोकांना मंत्रालयातून जाण्याची परवानगी देत आहोत. संध्याकाळी 6.30 नंतर हायटाईड आहे. त्यामुळे लोकांनी देखील काळजी घ्यावी. मुंबईतील संभाव्य पावसाच्या धर्तीवर पालिकेनं देखील तयारी केली आहे. जे अलर्ट संध्याकाळी येतील त्या आधारे शाळेसंदर्भात निर्णय होईल.”
राज्यात अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आहे. राज्यात 15 ते 16 जिल्हे असे आहेत ज्यामधे रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. वशिष्टी, अंबा, कुंडलिका या सगळ्या नद्यांच्या पाणीपाताळीवर प्रशासनाची नजर आहे. नाशिकमधे रावेर तालुक्यात सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे. अलमट्टी धरणाच्या पाणीपातळीवर नजर आहे. हिप्परगी धरणातून पाण्याचा विसर्ग करावा याची विनंती राज्य सरकारने कर्नाटक सरकारला केली आहे.
पुणे विभागातील घाट सेक्शनला रेड अलर्ट आहे. संभाजीनगर विभागात बीड, लातूर, नांदेडमधे पूरपरिस्थिती संभावित आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेडमधील विक्रमाबादमधे 206 मिमी पाऊस आहे. एऩडीआरएफ, एसडीआरएफची टीम तिथे आहे. जवळपास एक लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून 200 गावं बाधित झाली आहेत.