पार्थ पवार प्रकरण : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघड – उघड दोन गट पडले ?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे- महाराष्ट्राच्या राजकारणातील अनन्य साधारण महत्व पवार कुटुंबीयांना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे, पुतण्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, नातू आमदार रोहित पवार व पार्थ पवार हे सक्रिय राजकारणात असलेले पाहायला मिळते. तर, खुद्द शरद पवार यांनी ५० हुन अधिक वर्षे राजकारणासह समाजकार्यात घालवले असून राज्यातील महत्वाच्या पदांसह केंद्रीय स्थरावरील महत्वाची खाती देखील सांभाळली आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काहीशी नाराजी असल्याचे दिसून आले होते. या वक्तव्यानंतर पवार कुटुंबियांतील भेटीगाठी वाढल्या असून आज बारामतीमधील काटेवाडी या गावी पवार कुटुंबियांची महत्वाची चर्चा होऊ शकते अशी शक्यता सद्या वर्तवली जात आहे.
त्यामुळे राजकीय क्षेत्रातील सर्वांच्याच भुवया आता उंचावल्या असून येत्या काही दिवसात राजकीय भूकंप होणार का? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यात निर्माण झालेली अप्रत्यक्ष नाराजी आता शमणार कि वाढणार हे महत्वाचं मानलं जात आहे.
दरम्यान, अजित पवार हे सहकुटुंब बारामतीला जाणार असून तिथे श्रीनिवास पवार यांच्यासोबत याविषयावर चर्चा होऊ शकते. महत्वाची बाब म्हणजे, याआधी देखील जेव्हा पवार कुटूंबामध्ये काही राजकीय वाद निर्माण झाले होते तेव्हा श्रीनिवास पवार यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनिवास पवार यांनी त्यांच्या घरी कौटुंबिक भोजन ठेवले असल्याची माहिती मिळत आहे. काल पार्थ पवार यांनी पुण्यात अभिजित पवार यांची देखील भेट घेतली होती. पार्थ यांनी आपले काका व आत्या यांच्याशी देखील संवाद साधल्याचे समजते. पार्थ पवार यांच्या आत्या विजया पाटील यांनी, ” पार्थ हा संयमी आणि हुशार मुलगा असून सगळ्यांचा सन्मान करणारा आहे, त्यामुळे तो खूप मोठा वा वेगळा निर्णय घेणार नाही “, अशी प्रतिक्रिया दिली होती.
दरम्यान, लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्याविषयी शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उघड-उघड दोन गट पडले असून बहुतांश नेते शरद पवार यांच्या बाजूने दिसत आहेत.
राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, छगन भुजबळ असे नेते शरद पवारांच्या स्पष्टपणे बाजूने आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी पार्थ यांच्याविषयी आणि ते करत असलेल्या कृत्याविषयी काही गोष्टी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्याशिवाय काही नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी पार्थ पवार हे बाहेर तुमच्याबद्दल काय बोलतात, हे खा.पवार यांच्या कानावर घातल्याचे समजते.
काय आहे हे प्रकरण?
पार्थ पवार यांनी राम जन्मभुमी मंदिर भुमीपूजनाच्या दिवशी ‘जय श्रीराम’ म्हणत या निमित्त शुभेच्छा दिल्या होत्या, त्यामुळे हि भूमिका हि पवार कुटुंबाच्या विसंगत होती, ज्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे वेधले गेले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असून सुशांत प्रकरणी मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत असतानाच पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी भेट घेऊन सीबीआय चौकशी व्हावी यासाठी निवदेन देत मागणी गेली होती. त्यामुळे याविषयी शरद पवार यांना समाजमाध्यमांनी प्रश्न केला असता त्यांनी, ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली होती.