पाकिस्तानवर काऊंटर अॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “काळोख पडल्यावर गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तान सीमेवरील भारतीय शहरांवर हल्ले करण्यासाठी ड्रोन पाठवत आहे. भारत हे सर्व ड्रोन हवेतच नष्ट करत आहे. पाकिस्तानची ही आगळीक पाकिस्तानलाच भारी पडली आहे.
भारताने आज पहाटे पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला आहे. भारताने पाठविलेल्या ड्रोननी इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट घडविले असून रावळपिंडी एअरबेसजवळही धुराचे लोळ उठल्याचे पहायला मिळत आहेत.
भारताने पाकिस्तानवर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहेत. शुक्रवारी सायंकाळी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर सीमाभागात ब्लॅकआऊट करण्यात आले होते. ते रात्री १२ च्या सुमारास हल्ला परतवून लावल्यानंतर उठविण्यात आले. नागरिक हवी असेल तर लाईट चालू करू शकत होते. परंतू, आकाशात पुन्हा काही भागात ड्रोनच्या हालचाली दिसल्याने जालंधरसह पंजाबच्या काही भागात पुन्हा ब्लॅक आऊट करण्यात आले आहे.
पाकिस्तान सीमेपलीकडून पंजाबमधील अनेक शहरांच्या निवासी भागात हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. अमृतसरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमृतसरच्या उपायुक्तांनी लोकांना त्यांच्या घरातील दिवे बंद करण्याचे आणि खिडक्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. वीजपुरवठा खंडित झाला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या अखनूरमध्ये पूर्णपणे ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. स्फोटांचे आणि सायरनचे आवाज ऐकू आले आहेत.
दरम्यान, भारताकडून पाकिस्तानला जशासतसे प्रत्यूत्तर दिले जात आहे. पाकिस्तानच्या नरवाल, रावळपिंडीवर भारताने हल्ला केला आहे. याचे व्हिडीओ, फोटो आले आहेत. पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूर खान एअरबेसवर स्फोट झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी हवाई दलाचे IL-78 विमान या एअरबेसवर तैनात आहेत. ज्यामध्ये हवेतून हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे.शुक्रवारी सकाळी फ्लाइट ट्रॅकिंग अॅप्सवर, एक IL-78 विमान तुर्कीहून परतताना दिसले होते.
तीन एअरबेसवर भारताचा हल्ला…
भारताने पाकिस्तानी हवाई दलाच्या नूर खान (रावळपिंडी), मुरीद (चकवाल) आणि रफीकी (शोरकोट) हवाई तळांना लक्ष्य केले आहे, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, लढाऊ विमानांमधून हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. आम्ही भारताच्या शक्तीला, युक्त्यांना किंवा हल्ल्यांना घाबरणारा समुदाय नाही. आता त्याने आपल्या उत्तराची वाट पाहावी, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.