नियमित पीक पद्धतीत बदल आवश्यक- कुलगुरू डॉ. विलास भाले
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
: नियमित पीक पध्दतीमध्ये कपाशीचा पेरा कमी करून मका, ज्वारी, तेलबिया व कडधान्य या पिकांचा अंर्तभाव करण्याच्या सूचना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.
यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर व नागपुर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मध्य विदर्भ विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची 61 वी खरीप सभा नुकतीच ऑनलाईन संपन्न झाली. यावेळी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले हे सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सभेला विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, कृषी अधिष्ठाता डॉ. प्रदिप इंगोले, उद्यान विद्याचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, नागपुरचे सहसंचालक रविद्र भोसले, अमरावतीचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे, मध्य विदर्भाचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार तसेच यवतमाळ, वर्धा, चंद्रपुर व नागपुर या जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते.
सभेत कृषी निगडीत प्रश्नांवर विद्यापीठाचे शास्त्रज्ञासोबत चर्चा झाली. मध्य विदर्भातील गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन, टोळधाड किडीचे व्यवस्थापन, कपाशीवरील बोंडसड रोग इत्यादी विषयी प्रतिबंधक उपाय व व्यवस्थापन विषयी तांत्रीक संदेश कृषी विभागाला देण्यात आले. विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागामार्फत खरिपातील पर्जन्यमान अंदाजविषयी माहिती देण्यात आली. विद्यापीठाच्या कापसाचे बीटी व गैरबीटी वाणाची तसेच सोयाबिन पिकाच्या नवीन वाणाची बियाणे शेतकऱ्यापर्यत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याबाबत महाबिजच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच फळबाग लागवडीचे प्रक्षेत्र वाढविण्याविषयी कृषी सहसंचालकानी लक्ष देण्याचे सांगितले.
मध्य विदर्भाचे सहयोगी संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी प्रास्ताविक भाषणातून एकात्मिक शेती पध्दतीचे महत्व सांगितले.
सभेला विद्यापीठाचे विभाग प्रमुख, विविध पिकाचे विद्यापीठ संशोधन केंद्र प्रमुख, चारही जिल्ह्याचे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व आत्माचे प्रकल्पाचे संचालक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार डॉ . प्रमोद यादगिरवार यांनी व्यक्त केले.
सदर ऑनलाईन सभा (दुर-दृष्य संवाद) यशस्वी करण्यासाठी कृषी संशोधन केंद्र, यवतमाळचे प्रभारी अधिकारी डॉ. अ.सं.लाटकर, लेखा अधिकारी सुरेश सोनोने व राहुल धोटे यांनी सहकार्य केले.
०००००