काँग्रेस राष्ट्रवादी चा वाद शिगेला शरद पवारांचे टीकेचा चव्हाणानी घेतला समाचार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
भारत चीन प्रश्नावर ही राजकारण करण्याची गरज नाही. गस्त घालताना चीनचे सैन्य भारताच्या हद्दीत आल्याचे लक्षात आल्यावर भारतीय सैन्याने त्याचा प्रतिकार केला. गस्त घातली नसती तर हे लक्षातही आले नसते. त्यामुळे सध्या गोळीबार न होता केवळ झटापटी होत आहेत. चीनने कुरापत काढली आहे हे वास्तव आहे. पण भारताने त्याचा योग्य प्रतिकार केला. त्यामुळे ही वेळ राजकारणाची नाही’, असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. त्यावर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये जोरदार द्वंद्व रंगलेले पाहायला मिळत आहे
शरद पवार यांच्या वक्तव्याचा कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.चीनच्या प्रश्नावर राजकारण करू नये, हे खरे आहे. पण, विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आणि अधिकार आहे. त्यामुळे आम्ही प्रश्न विचारणारच. आम्ही काही घरगुती कामासाठी प्रश्न विचारत नसून जनतेसाठी आणि जनतेचा आवाज म्हणून प्रश्न विचारत आहोत’ अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले. तसंच, ‘सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे म्हणजे, विरोध करणे असं होत नाही. त्यांचे जे विचार काही असतील ते मान्य आहे. पण, आमचे विचार हे स्पष्ट आहे’ असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून चीन प्रश्नावर ‘ट्यून बदला हो!’ या शिर्षकाखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. यात भाजपला टोला लगावण्यात आला. ‘देशाची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा वगैरे विषयांत कोणी राजकारण करू नये. हे बरे नाही.’ पवार यांनी हा टोला काँग्रेस किंवा राहुल गांधी यांनाच लगावला असे भाजपपुरस्कृत समाज माध्यमांवर पसरवले जात आहे. चिनी घुसखोरीचे राजकारण करू नये, हे पवारांचे म्हणणे बरोबर! पवारांचा हा टोला सरकार पक्षालाही लागू पडतो. चीनप्रश्नी राजकारण कोणीच करू नये. पण असे राजकारण नक्की कोण करीत आहे? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीसंदर्भात विचारलेले प्रश्न म्हणजे पाण्यावरील बुडबुडे नाहीत. हेच प्रश्न कदाचित शरद पवार यांच्याही मनात घोळत असतील. चीनने आमच्या जमिनीवर घुसखोरी केली नाही, मग 20 जवानांचे बलिदान का झाले? चीन आमच्या हद्दीत घुसला आहे काय? हे सर्व प्रश्न तर आहेतच’ अशी आठवणही सेनेनं करून दिली.