राज्यपालाचा शिवसेना मंत्री उदय सामंत यांना कानपिचक्या,तर काँग्रेसचे मंत्री अमित देशमुखांचे कौतुक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करा म्हणून शिवसेनेचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आग्रही असताना, वैद्यकीय अभ्यासक्र माच्या परीक्षांचे वेळापत्रक सादर करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी गुरुवारी राजभवनावर गेले होते. परीक्षांच्या नियोजनावरून राज्यपालांनी काँग्रेसकडे असलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे कौतुक केले. शिवसेनेच्या मंत्र्याला कानपिचक्या, तर काँग्रेसच्या मंत्र्याचे कौतुक करून राज्यपालांनीही सूचक संदेश दिला आहे.
अंतिम वर्षांच्या सर्व परीक्षा रद्द करून सरासरीच्या आधारे गुण देण्यात यावेत यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री व शिवसेनेचे उदय सामंत आग्रही आहेत.स्वपक्षाच्या मंत्र्याच्या भूमिके नंतर अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेप घेतला. राज्यपाल आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये परीक्षांवरून धुसफुस सुरू असतानाच वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने तयार करण्यात आलेला परीक्षेचा विस्तृत आराखडा सादर केला. विद्यापीठाने परीक्षा घेण्याच्या संदर्भात केलेल्या नियोजनाचे राज्यपालांनी कौतुक केल्याचे राजभवनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.
परीक्षांसाठी तीन पर्याय
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत होणार असून परीक्षांच्या आराखडय़ाला राज्यपाल आणि कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली.वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत विद्यापीठाने तीन पर्याय समोर ठेवले आहेत. सध्या १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत कोणत्याही कारणास्तव परीक्षा घेता आल्या नाहीत तर, १६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत परीक्षा घेण्याचा दुसरा पर्याय आहे. हे दोन्ही पर्याय अमलात आणता आले नाहीत तर केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेऊन ऑनलाइन किंवा इतर पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.