वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम राज्याच्या निधी अभावी केंद्राने अडवू नये : पालकमंत्री संजय राठोड
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
पालकमंत्री राठोड यांनी वर्धा-यवतमाळ-नांदेड या 284 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित रेल्वे कामाच्या प्रगतीचा आज आढावा घेतला. जिल्ह्याच्या पायाभूत व सर्वांगीण विकासाकरीता रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आवश्यकच आहे. मात्र या विकासाच्या नावाखाली वनसंपदा, वन्यजीव यांना धोका पोहचू नये.
कोरोनाच्या संकटामुळे सद्यस्थितीत राज्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी राज्याच्या निधीअभावी केंद्राने काम अडवू नये. केंद्र सरकारच्या निधीमधून उर्वरीत कामांना चालना देऊन रेल्वे प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. जमीन भुसंपादन तसेच वन विभागाशी संबंधित काही अडचण असेल तर निकाली काढली जाईल. हा प्रकल्प जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून तो त्वरीत पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबईमध्ये रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेण्यात येईल.
वर्धा-नांदेड रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यात असून पहिला टप्पा वर्धा ते यवतमाळ (78 किमी) तर दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड (206 किमी) असा आहे. या प्रकल्पासाठी यवतमाळ जिल्ह्यातील लागणा-या जमीन अधिग्रहणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. दुस-या टप्प्यात रेल्वेने 94.20 हेक्टर अतिरिक्त जमीन अधिग्रहणाची मागणी केली आहे. वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे जवळपास 60 टक्के काम पूर्ण झाले असून यासाठी 1278 कोटी रुपये खर्च करण्यात आला. यापैकी 857 कोटी जमीन अधिग्रहणकरीता तर उर्वरीत 400 कोटींमध्ये या मार्गावरील 13 मोठे पूल, 70 छोटे पूल, टनल, स्टेशन बिल्डींग, ट्रॅक लिंकिंग अशी इतर कामे करण्यात आली आहे. तसेच कळंब ते यवतमाळ या दरम्यानच्या 10 पुलांचे काम प्रगतीपथावर आहे.