जनतेची काळजी घ्यावी, खा. पटेल यांचे प्रशासनाला निर्देश
राधाकिसन चुटे
विदर्भ वतन/ गोंदिया :
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लाकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. लाकडाऊनचा कालावधी एक महिन्यापेक्षा अधिक झाल्याने सामान्य जनतेला याचा फटका बसला आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी ज्या प्रमाणात जिल्हा प्रशासनाकडून घेतल्या जात आहे. त्याप्रकारे लाकडाऊनमुळे आर्थिकरित्या प्रभावित जनतेची काळजी घेऊन सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे, असे निर्देश राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्यांंशी चर्चा करताना दिले.
पटेल यांनी महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेत रविवार दिनांक १९ रोजी सकाळी ११ च्या सुमारास आपल्या मुळ मतदारसंघ असलेल्या गोंदिया-भंडारा जिल्ह्याचा दौरा केला. खासदार प्रफुल पटेल यांनी सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कादबंरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे व मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी या निवडक अधिकार्यांशी चर्चा केली. यावेळी खासदार पटेल स्वत: सोशल डिस्टंसचे पालन करीत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हयातील वैद्यकीय अधिकार्यांची संख्या, औषधांचा साठा, अन्न धान्य वितरण, केसरी कार्ड धारकांना अन्न धान्याचा पुरवठा सोबतच स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्याची काळाबाजारी, शासकीय योजनांच्या निधीचे बँकेतून वाटप, जिल्हयात अडकलेल्या बाहेर गावातील नागरिकांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था, शिवभोजन थाली योजना, कायदा सुव्यवस्था आदी योजना व त्याच्या अमलबजावणीविषयी माहिती जाणून घेतली.
जिल्हयातील धान उत्पादक शेतकर्यांना इटियाडोह व इतर सिंचन प्रकल्पाचे पाणी रबी हंगामाला देऊन पिक वाचविणे आदीं विषयांवर देखील चर्चा केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातूनच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खंडारे यांचेशी धानाचे बोनस व प्रलंबित चुकारे देण्याबाबत दुरध्वनीवरून सूचना केली. गोंदिया येथे कोरोना तपासणी केन्द्र सुरु करुन तपासणीची सुविधा उपलब्ध करुन द्यावे असे निर्देश प्रशासनाला दिले. संकटाच्या काळात प्रशासन हेच सामान्य जनता आणि शेतकर्यांचे मायबाप आहे. आई वडिल आपल्या पाल्यांची ज्याप्रमाणे काळजी घेतात, त्या प्रमाणे जिल्हा प्रशासनाने जनता आणि शेतकर्यांची काळजी घेऊन त्यांना मायेचा आधार द्यावा, असे निर्देश खासदार पटेल यांनी दिले