सर्व नागरिकांनी प्रशासनाला,पोलीस प्रशासनाला व आरोग्य विभागाला सहकार्य करावे- तहसीलदार दयाराम भोयर
राधाकिसन चुटे, जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया:- संचारबंदी, लॉकडावून हे आपणा सर्वांच्या हिताचे आहे. कोरोनाव्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. यासाठी आपण सर्व नागरिकांनी प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला,आरोग्य विभागाला सहकार्य करावे. तसेच कोरोनाव्हायरसचा प्रतिबंध करायचा असेल तर प्रशासनाने दिलेले निर्देशाचे नागरिकांनाही पालन करावे असे आवाहन आमगावचे तहसीलदार दयाराम भोयर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आदेशानुसार सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन करून तहसीलदार दयाराम भोयर यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुका वैद्यकीय अधिकारी भुमेश्वर पटले उपस्थितीत पोलीस पाटील, तलाठी व ग्रामसेवक यांची बैठक आयोजित करण्यात आली. होती.
या बैठकीत तहसीलदार दयाराम भोयर व तालुका आरोग्य अधिकारी भुमेश्वर पटले यांनी सांगितले की झालेल्या निर्णयानुसार covid-19 कोरोनाव्हायरस चा गावात प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावातील सर्व नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, घराबाहेर जाताना रुमाल किंवा मास्कचा वापर नाका-तोंडावर प्रत्येकाने करावा, शेतातील कामे करताना प्रत्येक मजुरांमध्ये एक मीटर अंतर असावे, गावात अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त मोटरसायकल, मोटर गाडी यांच्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. गावातील सर्व बांधकामे बंद करण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानात, बँकेचे व्यवहार करताना, दुकानात खरेदी करताना सामाजिक अंतर राखण्यात यावा. गावाबाहेरील व्यक्ती आल्यास गावात आल्याची माहिती ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग, तलाठी कार्यालय मध्ये नोंदणी करावी. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस सर्दी, खोकला, ताप, स्वसन घेण्यास त्रास होत असल्यास, त्वरित या व्यक्तीचे नाव आरोग्य विभागाकडे कळवून रुग्णालयात नेण्यात यावे, कोणतेही सामाजिक, धार्मिक, सण ,उत्सव जयंती, पुण्यतिथी ,वाढदिवस असे घरगुती कार्यक्रमात पाच व्यक्ती एकत्रित येणार नाही याची दक्षता घ्यावी. लहान मुलांना सोबत घेऊन कोणतेही साहित्य खरेदी करण्यास घराबाहेर पडू नये. अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या बैठकीत निर्णय घेण्यात आलेले आहेत. शहरातील व ग्रामपंचायत, येथील सर्व नागरिकांनी या निर्णयाची वैयक्तिक पातळीवर अंमलबजावणी करावी. सदर निर्णयाचे पालन करावे. अन्यथा मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 (1 (फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144, रोग प्रतिबंधक कायदा 1897 मधील खंड 2,3,4 चे तरतुदी नुसार निर्णयाचा भंग करणाऱ्या कार्यवाही करण्यात येईल. तसेच 200 रूपये दंड आकारण्यात येईल. याची सर्व नागरिकांनी तसेच ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दुकानदारांनी नोंद घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे .गावातील सर्व मालाची खरेदी विक्री नागरिकांनी व दुकानदारांनी सकाळी 7:00 वाजे ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत करावी. असेही आवाहन करण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील,तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते