देशभरातील व्याघ्रप्रकल्पांना कोरोनाच्या विषाणू पासून सावध राहण्याची गरज
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
नागपूर : भारतातील व्याघ्रप्रकल्प विदेशी पर्यटकांना खुणावत आहेत. सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनाने व्याघ्रप्रकल्पांना भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाकडे विदेशी पर्यटकांचा अधिक कल आहे. मात्र, भारतातही ‘करोना’ विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने सर्व व्याघ्रप्रकल्पांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, असे निर्देश राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिले आहेत.
मध्यप्रदेशातील पेंच, कान्हा व्याघ्रप्रकल्प तसेच महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प देशातीलच नाही तर विदेशातील पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण आहे. येथे बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते. खासकरून उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणावर पर्यटक येतात. अशावेळी गर्दीच्या ठिकाणी ‘करोना’ विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य संचालकांच्या सल्ल्यानुसार निसर्ग पर्यटकांच्या आरोग्य तपासणीसोबतच जिल्हा, राज्यस्तरावर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्या, अशी शिफारस राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सहाय्यक महासंचालक डॉ. वैभव माथूर यांनी के ली आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी सर्व संबंधित राज्यांना पाठवले आहे. पर्यटक एकत्र येत असल्याने ‘करोना’ विषाणूचा प्रादूर्भाव झपाटय़ाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रामुख्याने चीन, इटली, इराण, जपान, दक्षिण कोरियातील पर्यटकांचा संदर्भ त्यांनी या पत्रात दिला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच मोक्याच्या ठिकाणी आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्राने याबाबत जारी के लेले फलक पर्यटकांना दिसतील, अशा ठिकाणी लावण्यात यावेत अशीही सूचना या पत्रात करण्यात आली आहे.