भाजप आमदारांच्या निधनामुळे पुण्यातील 2 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर, 2 मार्चला मतमोजणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि 2 मार्चला मतमोजणी होणार आहे.
त्यामुळे पुण्यातील पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार की राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार हे पाहण्याचे ठरणार आहे. महाराष्ट्रातील दोन पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. कसबापेठमध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. तर पिपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे.
27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अर्ज भरण्यासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दिली आहे. असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम३१ जानेवारी अधिसूचना ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी अर्जांची छाननी १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार मतदान २७ फेब्रुवारी निकाल २ मार्च दरम्यान, पुणे आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडीला जुना हिशेब मोकळा करण्याची संधी मिळाली आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन पोटनिवडणुका ही स्वबळावर लढण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते.
‘पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन पोटनिवडणुका अजून आयोगाकडून जाहीर केल्या गेल्या नाही. अजून त्याबद्दल काही निर्णय झाला नाही. याआधी पिंपरीची जागा ही राष्ट्रवादी पुरस्कृत झाली होती.
तर पुण्यातली जागा ही काँग्रेसने लढवली होती. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. अनेक बदल झाले आहे. त्यामुळे पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्याची बैठक होईल आणि यामध्ये योग्य तो निर्णय जाहीर करू, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं होतं.
विशेष म्हणजे, पंढरपूर आणि अंधेरीमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली होती. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. एखाद्या राजकीय नेत्याचे निधन झाल्यावर उमेदवार देऊ नये, अशी राजकीय संस्कृती आजपर्यंत जोपासली गेली.
पण, दोन्ही निवडणुकीत भाजपने उमेदवार दिले होते. पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवत राष्ट्रवादीला धक्का दिला होता. राष्ट्रवादीचे उमेदवार भागीरथ भालके यांचा भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी पराभव केला होता. तर अलीकडेच मुंबईत शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिला होता. पण उमेदवार मागे घेण्याची नामुष्की आली होती. त्यामुळे आता पुण्यात पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी उमेदवार देणार का हे पाहण्याचे ठरणार आहे.