वंचित चे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अब्दुल रहेमान यांच्या नामांकन अर्ज अवैध ठरला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
धुळे :- लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका 7 मे रोजी होणार आहेत. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
धुळे लोकसभेचे वंचित आघाडीचे उमेदवार माजी IPS पोलीस अधिकारी अब्दुल रहेमान यांचा उमेदवारी अर्ज अवैध असल्याचं समोर आलं आहे.
उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया दरम्यान अब्दुल रहेमान यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. धुळ्यात लोकसभेसाठी वंचित आघाडीकडून माजी IPS पोलीस अधिकारी अब्दुल रहेमान यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच मोठा धक्का प्रकाश आंबेडकर यांना बसला आहे.
माजी आयपीएस पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांनी 2019 साली आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा मंजूर न झाल्याच्या कारणावरून उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.
धुळे मतदारसंघात भाजपने तिसऱ्यांदा डॉ. सुभाष भामरे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तर काँग्रेसने माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांमध्ये आता काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते.
महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीआधी जाहीर केलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी उमेदवारही दिले. महाविकास आघाडीसोबत त्यांचं कुठे बिनसलं हे देखील त्यांनी सांगितलं होतं. मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचे नेते निवडणूक लढवण्यासाठी तयार नव्हते त्यामुळे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं प्रकाश आंबेडकर प्रचार सभेदरम्यान म्हणाले होते.
तांत्रिक कारणाने आपला उमेदवारी अर्ज अवैध केल्याचा रहेमान यांचा आक्षेप आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाच्या विरोधात हायकोर्टात जाणार असल्याची प्रतिक्रिया अब्दुल यांनी दिली आहे. धुळ्यात आता दुसरा उमेदवार कोण असेल? कुणाला पाठिंबा मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.