जिल्ह्यात सुधारित मार्गदर्शक सूचना लागू ; रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यत जमावबंदी ; बंद जागेतील समारंभात १०० उपस्थितांची मर्यादा ; खुल्या जागांवरील समारंभांमध्ये उपस्थितांची मर्यादा २५०
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 26 डिसेंबर :- गेल्या काही दिवसांत राज्यात व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ओमिक्राॅनचे वेगाने वाढते रुग्ण पाहता राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार गृह विभागाच्या, दिनांक २३ डिसेंबर २०२१ मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे जिल्हयामध्ये खिसमस (नाताळ) हा सण साजरा करण्यात यावा. लग्नसोहळ्यांमध्ये, मंगल कार्यालये, हॉल अशा बंद जागांमध्ये उपस्थितांची एकूण संख्या ही १०० पेक्षा जास्त नसावी. तसेच खुल्या जागांवरील समारंभांमध्ये उपस्थितांची मर्यादा २५० किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल, एवढीच असावी. अन्य सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये जेथे लोकांची सतत उपस्थिती राहील असे कार्यक्रम बंद जागेमध्ये (उदा.बंदिस्त हॉल, सभागृह ई.) आयोजित करते वेळी अधिकतम १०० उपस्थितांची मर्यादा पाळण्यात यावी. असे समारंभ मोकळया जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त २५० किंवा त्या ठिकाणच्या क्षमतेच्या २५ टक्के यापेक्षा जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. वर नमूद केलेल्या बाबीमध्ये समाविष्ट नसलेल्या इतर कार्यक्रमांच्या बाबतीत, ज्या ठिकाणी आसन व्यवस्था निश्चित असून बदलता येणार नाही अशा ठिकाणी उपस्थितांची संख्या बंदीस्त सभागृहाच्या परवानगी दिलेल्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के पेक्षा जास्त नसावी. तसेच जेथे बैठकव्यवस्था तात्पुरत्या स्वरुपातील किंवा बदलत्या स्वरुपाची आहे, अश्या ठिकाणी एकूण आसनक्षमतेच्या २५ टक्के एवढीच उपस्थिती असावी.
खेळ, क्रिडा स्पर्धांचे आयोजन करतांना एकूण प्रेक्षक संख्येच्या 25 टक्के पेक्षा जास्त प्रेक्षकांची उपस्थिती मैदाने / स्टेडियमवर राहणार नाही ह्याची दक्षता घ्यावी.
इतर कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यामध्ये किती गर्दी असावी ह्या बाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील. परंतू शासन आदेश दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ मध्ये नमूद
मर्यादेपेक्षा जास्त लोकांना अश्या ठिकाणी परवानगी देता येणार नाही.
हॉटेल, रेस्टॉरंट्स, जिम्नॅशियम, योगा सेन्टर, स्पा, सिनेमा हॉल आणि चित्रपटगृहे हे परवानगी प्राधिकरणांनी मान्यता दिलेल्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु
ठेवण्याची परवानगी असेल. ह्या आस्थापनांनी त्यांची मान्यता प्राप्त आसन क्षमता दर्शनीभागावर नागरीकांच्या माहीतीसाठी लावणे बंधनकारक राहील.
यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण शहरी व ग्रामिण भागात रात्री ९.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यत ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यासाठी बंदी घालण्यात येत आहे.
उक्त सुचनांमध्ये समाविष्ट नसलेल्या कोणत्याही बाबींसाठी, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन
उक्त सुचनांना सुसंगत असे निर्बंध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास नागरीकांना पुरेशी
पूर्वसूचना देऊन अमलात आणता येतील.
विशेष स्थानिक परिस्थितीचा विचार करता वर नमूद बाबींसाठी जिल्ह्यात ह्या आदेशात नमुद निर्बंधापेक्षा कडक निर्बंध लादणे गरजेचे आहे अशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची खात्री झाली तर नागरीकांना पूरेशी पूर्वकल्पना देऊन असे कडक र्निबंध जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणांस लादता येईल. उक्त आदेशात नमूद बाबी व्यतिरिक्त अस्तिवात असणारे इतर सर्व निबंध शासन आदेश दिनांक, २७ नोव्हेंबर २०२१ प्रमाणे लागू राहतील.
सदर आदेश यवतमाळ जिल्हयातील संपूर्ण शहरी व ग्रामीण भागासाठी दिनांक २५ डिसेंबर २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.