भारतात “बूस्टर डोस” कोणाला आणि कधी मिळणार…? ; जगभरात आता ओमिक्रॉनने डोकेदुखी वाढवली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दिल्ली :- भारतात देण्यात येणार असला तरी मोदींनी त्यांच्या भाषणात बूस्टर डोस असा शब्द मात्र वापरलेला नाही.
जगभरात आता ओमिक्रॉनने डोकेदुखी वाढवली आहे. या व्हेरिअंटला रोखण्यासाठी जगभरात अनेक देशांनी पुन्हा निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे.
भारतातही अनेक राज्यांमध्ये नाइट कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान, भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. मोदींनी बूस्टर डोस देण्यात येणार अशी घोषणा केली असली तरी डोसचा असा उल्लेख केला आहे. मोदींनी त्यांच्या भाषणात बूस्टर असा शब्द वापरला नाही. त्याऐवजी प्रतिबंधात्मक डोस असं म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशवासीयांना नाताळच्या शुभेच्छाही दिल्या. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती असल्याने कोरोनाविरोधात सुरू असलेल्या देशाच्या लढाईसाठी काही नव्या उपाययोजनांची आजच घोषणा करणेही योग्य ठरले असे ते म्हणाले. ओमिक्रॉन या व्हेरिएंटने जगातील प्रत्येक देशाला प्रभावित केले असून हा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने सावध राहणे गरजेचे असल्याचे मोदींनी नमूद केले.
कोरोनाप्रतिबंधक उपायांचे पालन करावे आणि सर्वांनी मास्क घाला, हात वारंवार धुवा असंही आवाहन मोदींनी यावेळी केलं. नववर्षाचे स्वागत करतानाच सावधही राहा, अनेक अफवा पसरतात त्याला बळी पडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका असेही मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं सांगताना मोदी म्हणाले की, अठरा लाख आयसोलेशन बेड देशभर सज्ज आहेत. पाच लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेडची तयारी करण्यात आली आहे. तर एक लाख चाळीस हजार आयसीयू बेड तयार आहेत. लहान मुलांसाठी ९० हजार बेडची निर्मिती करण्यात आली आहे. तसंच तीन हजारांवर ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्यात आले असून राज्यांना औषधांच्या बफर स्टॉकसाठी मदत करण्यात येईल असंही मोदींनी भाषणात सांगितलं.
प्रतिबंधात्मक डोस कुणाला कधी?
पंतप्रधान मोदींनी भाषणावेळी घोषणा करताना सांगितलं की, आता पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जाणार आहे. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि सहव्याधी असणाऱ्या आणि साठीपार केलेल्या ज्येष्ठांनाही प्रतिबंधात्मक डोस दिला जाणार आहे. लहान मुलांसाठीची लसीकरण मोहीम नव्या वर्षात ३ जानेवारीपासून सुरू होणार असून तर प्रतिबंधात्मक डोस १० जानेवारीपासून द्यायला सुरूवात होणार आहे. सहव्याधी असलेले पण वयाची साठीपार केलेल्या ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक डोस घेता येईल.
‘डीएनए’ लसही मिळणार
देशात लवकरच नाकावाटे घेतली जाणारी आणि जगातील पहिली ‘डीएनए’ लस द्यायलाही सुरूवात होणार आहे असेही मोदींनी यावेळी जाहीर केले. लशींच्या निर्मितीसाठी देशातील वैज्ञानिकांनी अथक मेहनत घेतली असून त्यांच्या सल्ल्यानुसारच केंद्र सरकारने काम केले असून त्याचे सकारात्मक परिणाम देखील हाती येत असल्याचे मोदींनी सांगितले.