विधान परिषदेचे १७ आमदार पुढील वर्षी निवृत्त ; राजकीय चित्र बदलणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह विधान परिषदेचे १७ आमदार पुढील वर्षात निवृत्त होत आहेत.
निवृत्त होणारे दहा आमदार हे विधानसभा सदस्यांमधून निवडून आलेले आहेत, तर उर्वरित सात हे स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील आहेत. नवीन वर्षात होणाऱ्या या निवडणुकीमुळे विधान परिषदेतील राजकीय चित्र पूर्णपणे बदलणार आहे. विधानसभा सदस्यांमधून निवडून येणाऱ्या दहा जागांसाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २७ मतांची आवश्यकता असेल. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक सदस्य निवडून येऊ शकतो. दहाव्या जागेकरिता चुरस असेल. काँग्रेसकडील अतिरिक्त मते आणि अपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीकडून पुरस्कृत करण्यात येणारा उमेदवार निवडून येऊ शकतो. महाविकास आघाडी सहा तर भाजपचे चार उमेदवार निवडून येतील, असे गणित आहे.
स्थानिक प्राधिकारी संस्थेच्या सात मतदारसंघातील निवडणुकीत चुरस असेल. अधिक ‘लक्ष्मीदर्शन’ करणाऱ्याला विधान परिषदेत संधी असते. पुढील वर्षी ठाणे, पुणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, भंडारा – गोंदिया व यवतमाळ मतदारसंघांतील आमदारांची मुदत संपुष्टात येत आहे. याबरोबरच नगर आणि सोलापूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील लांबणीवर पडलेली निवडणूकही पुढील वर्षात होईल.
सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पुन्हा संधी दिली जाते का, याची उत्सुकता असेल. उभयतांचे वय झाले असले तरी अनुभव तसेच उपयोगिता लक्षात घेऊनच राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेतृत्व निर्णय घेईल.
भाजपपुढे आव्हान
निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सर्वाधिक आठ आमदार हे भाजपचे आहेत. शिवसेना चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन तर काँग्रेसचे दोन आमदार निवृत्त होत आहेत. संख्याबळ कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान असेल. विधानसभेतून भाजपचे चार उमेदवार निडून येऊ शकतात. स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील चित्र कागदावरील संख्याबळावरून ठरत नाही तर कोणता उमेदवार अधिक ‘प्रभावी’ आहे हे महत्त्वाचे असते. विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त १२ जागा रिक्त आहेत. याबरोबरच १७ सदस्य नव्या वर्षात निवृत्त होत असल्याने राजकीय चित्र बदलेल.
निवृत्त होणारे सदस्य
भाजप
प्रवीण दरेकर (विरोधी पक्षनेते), सदाभाऊ खोत, सुजिर्तंसह ठाकूर , विनायक मेटे, प्रसाद लाड, रामनिवास सिंह, चंदुभाई पटेल, परिणय फुके,
शिवसेना
उद्योगमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी,
राष्ट्रवादी काँग्रेस
संजय दौंड, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अनिल भोसले
काँग्रेस
मोहन कदम , अमर राजूरकर