संपात सहभागी असलेले कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदल्या ; संप फोडण्यासाठी महामंड़ळाची कठोर कार्यवाही….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी कामगारांचा संप फोडण्यासाठी आता महामंडळाने संपात सहभागी कामगारांच्या इतर आगारांत बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाने यवतमाळ जिह्यातील एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी एसटीच्या चालक आणि वाहकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे
एसटी कामगारांचा यशस्वी संप फोडण्यासाठी निलंबनाच्या कारवाईनंतर आता दुसरा एक उपाय म्हणून एसटी कर्मचाऱ्यांची इतरत्र आगारांत बदली करण्यास सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिह्यातील दिग्रस तालुक्यातून वणी तालुक्यात एसटीच्या चालक आणि वाहकांची बदली करण्यात आली आहे, तर काही जणांची वणी तालुक्यातील आगारातून नेर तालुक्यातील आगारात बदली करण्यात आली आहे. तसेच बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, आज शनिवारी 67 आगारांतील वाहतूक सुरळीत सुरू होती. सायंकाळी सहा वाजेपर्यंत विविध आगारांतून 1,564 गाडय़ा सोडण्यात आल्या.
9,625 कर्मचारी निलंबित
एसटी महामंडळाने शनिवारी 245 कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून आतापर्यंत एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या 9,625 इतकी झाली आहे. तर आज 10 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली असून एकूण सेवा समाप्त करण्यात आलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांची संख्या 1,990 इतकी झाली आहे.