भाजपाविरोधात एकजुटीने लढले पाहिजे ; नाना पटोले यांचे ममता बनर्जीना प्रत्युत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नव्हे, तर एकजुटीने लढण्याची गरज आहे, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यूपीए आता अस्तित्वात राहिली नाही, कॉंग्रेसला वगळून पर्यायी आघाडी निर्माण करणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. कॉंग्रेसला वगळून पर्यायी आघाडी तयार करण्याच्या ममता बॅंनर्जींच्या वक्तव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.
नाना पटोले म्हणाले, वेगवेगळ्या मार्गांचा वापर करुन भाजप लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याविरोधात कॉंग्रेसने सातत्याने आवाज उठवला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सामान्यांच्या प्रश्नावर लढा दिला आहे. देशातील परिस्थिती लक्षात घेऊन व्यक्तिगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी लढणं आवश्यक आहे. भाजपविरोधी लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे.
ममता बॅंनर्जींच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत कॉंग्रेसला आणि कॉंग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच कॉंग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला, असे ते म्हणाले.