कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत आर्थिक मदतीसाठी प्रयोगात्मक कलाप्रकारातील कलाकारांकडून प्रस्ताव आमंत्रित….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 01 डिसेंबर :- यवतमाळ जिल्ह्यातील प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलाकार यांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे कोविड दिलासा पॅकेज अंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. इच्छुक कलाकारांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज पुढील दहा दिवसात संबंधीत तहसिलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू होता. तसेच, लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहावे लागले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रमही या काळात स्थगित करण्यात आलेले होते. या काळात सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटीत व असंघटीत कलाप्रकारातील विविध कलाकार, ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे असे आहे, त्यांची आर्थिक कुचंबणा झाल्याने राज्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कलाप्रकारातील कलाकारांना शासनामार्फत एकरकमी आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने दिनांक 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयान्वये घेतला असून पात्र एकल लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावरील समितीने पात्र केलेल्या कलाकारांची यादी विहित तपशीलासह संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांचेकडे सादर करण्यात आल्यानंतर त्यांचेमार्फत पात्र लाभार्थांच्या बँक खात्यात अनुज्ञेय अर्थसहाय्य वर्ग करण्यात येणार आहे.
कोविड दिलासा पॅकेजसाठी एकल कलाकारांकरीत पात्रता निकष व अटी : महाराष्ट्र राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण असणारे आर्थिकदृष्टया दुर्बल कलाकार अर्ज करण्यास पात्र असतील. त्यांचे महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असावे, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असावे, वार्षिक उत्पन्न रुपये 48 हजारच्या कमाल मर्यादेत असावे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
एकल कलाकाराने अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : दि. 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-ब-1 नुसार विहित नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला यात स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखलाही ग्राह्य राहील. तहसिलदारांकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला, कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे, आधार कार्ड व बँक खाते तपशील, शिधापत्रिका सत्यप्रत अर्जासोबत जोडावे.
समुह लोककलापथकांचे चालक, मालक, निर्माते यांनी 3 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयातील परिशिष्ट-ब-2 नुसार सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे अर्ज सादर करावा.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त एकल कलाकारांनी आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.