मुंबईतील सर्व कार्यक्रम रद्द करून शरद पवार दिल्लीत दाखल ; विविध राजकीय चर्चांना उधाण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलदेखील राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलदेखील राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. शरद पवार मुंबईतील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला गेल्याचं समजत आहे. विशेष म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दिल्ली दौऱ्यात शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विरोधकांची बैठक असून त्यात सहभागी होण्यासाठी शरद पवार गेल्याचंही बोललं जात आहे. मात्र नेमकं कारण गुलदस्त्यात आहे.
दुसरीकडे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत खलबतं सुरु आहेत. दोन्ही नेते भाजपाच्या महत्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार आहेत. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.