उध्दव ठाकरेंची शिवसेना हा दलालांचा पक्ष : एकनाथ पवार यांचा ‘शिवसेनेला जय महाराष्ट्र’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उद्धव ठाकरेंची शिवसेना हा दलालांचा पक्ष असल्याचा आरोप करत राज्य संघटक एकनाथ पवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत, सुषमा अंधारे आणि संपर्कप्रमुख बबन थोरात हे दलाल असल्याचा गंभीर आरोप करत एकनाथ पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
एकनाथ पवार यांनी नांदेडमधील लोहा- कंदार विधानसभेत शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. या पराभवाचं खापर त्यांनी या नेत्यांवर फोडलं आहे. मला अशा नेत्यांसोबत काम करायचं नाही असं म्हणत एकनाथ पवार राजीनामा दिल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचा राजीनामा दिला असून लवकरच पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे पवार यांनी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ पवार यांनी भाजपाला सोडचिट्टी देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून लवकरच ते भाजपमध्ये घरवापसी करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.