पालकमंत्र्यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी ; सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही ; 85 सि.सि.टी.व्ही कॅमेरे लावणार ; संरक्षक भिंतीची उंची 10 फुट वाढवणार ; 15 नवीन हायमास्क लाईट लागणार ; रुग्णालय परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी ; एक पोलीस जीप व दोन मोटारसायकल रूग्णालय परिसराच्या गस्तीसाठी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 24 नोव्हेंबर :– वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काही दिवसांपुर्वी घडलेली घटना दुर्दैवी होती मात्र यापुढे या परिसरात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी येथे तातडीने सुरक्षीततेच्या उपाययोजना करण्यासाठी सी.सी.टी.व्ही. यंत्रणा, हायमास्क लाईट, संरक्षक भिंतीची उंची वाढविणे, कायमस्वरूपी पोलीस चौकी इ. कामांना विशेष बाब म्हणून मंजूरी देण्यात येत असल्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयातील संपुर्ण परिसराची पालकमंत्री यांनी आज पाहणी केली व येथील सुरक्षेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र गवार्ले प्रामुख्याने उपस्थित होते.
शासकीय रुग्णालयाचा सुमारे 127 एकर परिसर पुर्णपणे सी.सी.टी.व्ही. अंतर्गत आणण्यात येत असून त्यासाठी सध्या 85 सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहे. सी.सी.टी.व्ही. यंत्रणेद्वारे रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे व वाहनाचे छायाचित्र जतन केले जाणार आहे. तसेच रुग्णालयाच्या संपुर्ण परिसरात उजेड राहावा म्हणून जुन्या तीन हायमास्क लाईटच्या दुरूस्तीसह नवीन 15 हायमास्क लाईट लावण्यात येत आहे. यासोबतच संरक्षक भिंतीची उंची 10 फुटापर्यंत वाढवून त्यावर 2 फुट तारचे कुंपण बांधण्यात येणार आहे. तसेच रुग्णालयाची संरक्षण भिंत अतिक्रमणापासून मोकळी करण्यात येणार आहे. मुख्य प्रवेशद्वार वगळता इतर ठिकाणचे अनावश्यक प्रवेशद्वार पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. रुग्णालय परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी बांधण्यात येणार असून येथे एक पोलीस जीप व दोन मोटारसायकल पोलीसांच्या गस्तीसाठी राहतील.
पालकमंत्री यांनी रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेबाबत रुग्णालय प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. केवळ इमारत चकाचक ठेवून चालणार नाही त्यासोबत संपुर्ण परिसर नियमितपणे स्वच्छ राहील याकडेही लक्ष ठेवण्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणी झाडांची उंची वाढल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार पडत असल्यास त्याठिकाणच्या झाडांच्या फांद्या कापून परिसरात उजेड राहील व परिसर सि.सि.टी.व्ही. च्या दृष्टीक्षेपात राहील याबाबत दक्षता घेण्याचे सांगितले. याठिकाणचे काही बंद असलेले लाईट तातडीने सुरू करण्याचेही त्यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी राहता यावे, यासाठी परिसरातील वसतीगृहाची क्षमता वाढ करून 200 मुलांकरिता वाढीव वस्तीगृह बांधण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पालकमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांसोबतही चर्चा केली सुरक्षीततेच्या दृष्टीने उपायोजना लवकरच पुर्ण करण्यात येतील असे सांगितले. काही दिवसांपुर्वी या परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना मुख्यमंत्री यांचेकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीला रुग्णालय अधिक्षक सुरेंद्र भुयार, शासकीय वैद्यकीय रूग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी, विद्युत विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.