शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्ष आंदोलनात उतरणार :- आ. अमरनाथ राजूरकर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड / माहूर (राजकिरण देशमुख) दि. ९ ऑक्टो. :-
महाविकास आघाडीने येत्या सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधानपरिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात निवेदन करताना आ. राजूरकर म्हणाले की, गेल्या बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील बाळासाहेब थोरात, जयंत पाटील व एकनाथ शिंदे या तीनही पक्षाच्या प्रमुख मंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाकडून शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडून ठार मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र बंद’ जाहीर केला होता. आज सुद्धा खा. संजय राऊत, नवाब मलिक आणि सचिन सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांवरील दडपशाहीच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबर रोजीचा बंद नियोजित असल्याचे सांगितले.
या आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडताना आ. अमरनाथ राजूरकर पुढे म्हणाले की, केंद्रातील सरकार शेतकऱ्यांवर इंग्रजांसारखी दडपशाही करते आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाखाली चिरडून ठार मारण्याची ही अमानवीय, क्रूर मानसिकता यापूर्वी देशाने फक्त स्वातंत्र्यपूर्व काळातच पाहिली असेल. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांनी बंदला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
या आंदोलनामध्ये नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल तसेच पक्षाचे विविध सेल, माजी मंत्री डी.पी. सावंत, माजी खासदार सुभाष वानखेडे, आ. मोहन हंबर्डे, आ. माधवराव जवळगावकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर आदी नेते सहभागी होणार आहेत. तसेच अत्यावश्यक सेवांना या आंदोलनातून वगळण्यात आल्याची माहिती आ. अमरनाथ राजूरकर यांनी दिली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….