बालकांच्या संवेदनशील समस्यांसाठी मोफत समुपदेशन सेवा सुरू ; बाल संरक्षण कक्षाच्या भ्रमणध्वनी ९११२१३७०४६ क्रमांकावर करा संपर्क….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 5 ऑक्टोबर :- मागील वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समाजातील सर्व नागरिकांना त्याची झळ पोहचली आहे. घरच्या व्यक्तीचा मृत्यू, नोकरी जाणे, बेरोजगारी सारख्या अनेक समस्या व मध्यंतरी शाळा देखील बंद होत्या. या परिस्थितीने अधिकाधिक परिणाम हा कुटुंबातील महिला व बालकावर झाला. बालकांच्या संवेदनशील समस्या असल्याने त्यांना वेळीच समुपदेशन मिळाल्यास निश्चित मदत होईल या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संकल्पनेतून गरजू बालकांकरीता समुपदेशन कक्ष हा उपक्रम जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय व बहुजन हिताय सोसायटी- अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आला आहे.
बालक व त्यांच्या पालकांनी कामकाजाच्या दिवशी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, दगडी इमारत, टांगा चौक,
यवतमाळ येथे समुपदेशन कक्ष येथे अथवा समुपदेशक शिरीष इगवे (भ्रमणध्वनी क्र. ९११२१३७०४६) यांना कार्यालयीन वेळत संपर्क करून सेवेचा लाभ घ्यावा. याद्वारे ज्या बालकांच्या समस्या आहेत, अश्या बालकांना व त्याच्या पालकांना मोफत समुपदेशन सेवा देण्यात येणार आहे. करीता गरजू बालक व पालक यांनी समुपदेशन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले.
000