उमरखेड बस दुर्घटना : दोघांना वाचविण्यात यश तर तिघांचे मृतदेह काढले ; पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडण्याचे धाडस करू नये :- जिल्हाधिकारी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि.28 सप्टेंबर :- आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान बस क्रमांक एम एच- 14 बी टी-5018 ही नागपूर डेपोची नांदेड ते नागपूर जाणारी बस उमरखेड शहराजवळ उमरखेड ते पुसद रोड वरील दहागाव नाल्यात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातर्फे बचाव कार्य सुरू करण्यात आले. या घटनेत दोन प्रवाशाना सुखरूप बाहेर काढण्यात आले तर दोन प्रवाशी व वाहकाचा मृतदेह सापडला आहे.

दरम्यान पूर परिस्थीतीत किंवा अतिवृष्टी काळात नद्या, नाले दुथडी भरून वाहत असतांना पूल अथवा रस्त्यावर पाणी वाहत असल्यास अशा वेळी पूल ओलांडण्याचे धाडस कोणी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
अपघातग्रस्त बसमध्ये चालक व वाहक यांचेसह इतर चार प्रवासी असे एकूण सहा जण होते. प्रवाशापैकी शरद नामदेव फुलमाळी वय 27 वर्षे रा. करोळ ता. पुसद तसेच सुब्रमण्यम सूर्यनारायण तोकला वय 48 वर्ष या दोन व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच शेख सलीम उर्फ बाबू शेख इब्राहीम वय 50 रा. वारा ह.मु. हैद्राबाद आणि इंदल रामप्रसाद महिंद्रे वय 35 रा. कारोळ ता. पुसद व बस वाहक भीमराव लक्ष्मण नागरिकर, घाट रोड नागपूर हे मृत झाले असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. बस चालक सुरेश रंगप्पा सुरेवार, नागपूर हे तापावेतो बसमध्येच अडकून असल्याची प्राथमिक माहिती तहसिलदार आनंद देवूळगावकर यांनी दिली आहे.
घटनास्थळी शिघ्र बचाव पथक पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे. उमरखेड पोलीसांमार्फत पंचनामा करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळी तळ ठोकला असून स्थानिक बचाव पथक, जिल्हा शोध व बचाव पथक व नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.
संपुर्ण घटनेवर जिल्हाधिकारी अमोल येडगे लक्ष ठेवून आहेत. सध्या सर्व प्रकल्प 100 टक्के भरले आहेत व पावसामुळे त्यातुन पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरू असल्याने नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज असून नदी, नाल्याचे पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असल्यास रस्ता किंवा पूल ओलांडण्याचे धाडस करू नये तसेच पुर व पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे. नदीकाठच्या नागरिकांनी सावधगीरी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….