मांडवी, इस्लापूर, बोधडी तालुके करून किनवट जिल्हा घोषित करा ; नामदेवराव केशवे यांचे पालकमंत्री अशोकराव चव्हाणांना साकडे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- किनवट माहूर तालुक्यातील विविध प्रश्न निकाली काढल्याबद्दल सर्वप्रथम आभार मानून किनवट विधानसभा मतदारसंघातील मांडवी, इस्लापूर बोधडी तालुके घोषित करून किनवट जिल्हा घोषित करून आदिवासी बहुल भागाच्या विकासाच्या मार्गाला आणखी गती द्यावी अशी मागणी जेष्ठ कॉंग्रेसनेते माजी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष, अ.भा.कॉंग्रेस कमिटीचे निमंत्रक तथा कापूस पणन महासंघाचे संचालक नामदेवराव केशवे यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान नांदेड जिल्हा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. किनवट येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत ११ वी व १२ वी वर्गात श्रेणीवाढ करण्यात आली असून त्याबद्दल ना.चव्हाण यांचे आभार मानले आहेत. कै. डॉ. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असतांना कै. किशनराव पाचपुते आमदार असतांना आदिवासी विद्यार्थ्याकरिता किनवट विधानसभा क्षेत्रात १३ आश्रमशाळा दिल्या असून त्यांच्याच पावलावर पाउल ठेवत ना.अशोकराव चव्हाण यांनी या मतदारसंघात अनेक कामे केली. त्यामध्ये माहूर नगरपंचायत, रेणुकादेवी, दत्तप्रभूचे ठिकाण असलेल्या या तीर्थक्षेत्रास विकासाच्या दृष्टीने योग्य तो तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला. माहूर नगरपंचायत स्थापनेमुळे माहूर शहराची विकासाकडे वाटचाल होत आहे. गत काळात स्व. उत्तमराव राठोड यांच्या कारकिर्दीत झालेल्या रस्त्याना पुनर्निमाणसाठी यावर्षी निधी दिला. मनिरामथड येथील धरणास १६ कोटी रुपयाचा वाढीव निधी मंजूर केला. तसेच ६५ वर्षांपासून कुठल्याही लोकप्रतिनिधीने लक्ष न दिलेल्या सिंदखेड येथील गाव व तांड्या दरम्यान असेलल्या नाल्यावर गाव जोडण्यासाठी पूल मंजूर करून जनतेचा प्रश्न निकाली काढावा व कायमस्वरूपी प्रश्न मीटवावा. व ग्रामीण भागातील रस्त्यासाठी निधी मंजूर करावा. जोडरस्ता आष्टा ते नखेगाव, आष्टा ते मुरली, राष्ट्रीय महामार्ग १६१ अ ते उमरा-आष्टा व वडसा ते नागनाथ मंदिर रस्ता ता. माहूर (ग्रा.मा.-०८० रस्त्याची पूल मोऱ्या सह सुधारणा करणे, आदी विकास कामे मार्गी लावावी.
स्व. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असतांना किनवट येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात आले आपण जिल्हा निर्मिती करून द्यावी तसेच किनवट व माहूर या दोन्ही ठिकाणी सर्व सोयी-सुविधेनीशी उप जिल्हा रुग्णालय मंजूर करावे किनवट विधानसभा मतदार संघातील किडनी आजरासंबधीचे रुग्ण उपचारासाठी एक दिवसाआड नांदेडला जातात या सर्व गरजू रुग्णांची किनवट माहूर येथे सुविधा उपलब्ध करून आदिवासीबहुल व डोंगरऱ्यात वास्तव्यास असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दिलासा द्यावा यासह प्रामुख्याने मांडवी, इस्लापूर, बोधडी तालुके करून किनवट जिल्हा घोषित करावे असे साकडे नामदेवराव केशवे यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात घातले आहे.