जीएमसी मृतदेह बेपत्ता प्रकरण ; कुटुंबियांनी घेतले उपोषण मागे ; चौकशी समितीचा अंतिम अहवाल मंगळवार पर्यंत…
जीएमसी मृतदेह बेपत्ता प्रकरण ; कुटुंबियांनी घेतले उपोषण मागे ; चौकशी समितीचा अंतिम अहवाल मंगळवार पर्यंत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 24 :- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोशन भीमराव ढोकणे (वय 27) या तरुणाचा मृतदेह बेपत्ता प्रकरणी चौकशीअंती वस्तुस्थिती कुटुंबियांना सांगितल्यानंतर सदर कुटुंबियांनी उपोषण मागे घेतले आहे. तर चौकशी समितीचा अंतिम अहवाल मंगळवारपर्यंत येणार असून संबंधित दोषीवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने म्हटले आहे.
रोशन भीमराव ढोकणे याच्या मृतदेहावर मारोती दासू जाधव या नावाने डेथ लेबल लागून वॉर्डातून मॅरच्युरीमध्ये गेला. मृतक मारोती जाधव यांचा मुलगा विनोद जाधव याची मनस्थिती बरी नसल्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याच्यावेळी दुर्लक्ष / कानाडोळा केल्यामुळे मारोती जाधव यांच्या जागी रोशन ढोकणे याच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार यवतमाळ नगर परिषदेमार्फत 21 एप्रिल रोजी करण्यात आला.
मारोती जाधव कोरोना पॉझेटिव्ह होते. तसेच मॅरच्युरीमध्ये आणखी एक पुरुष मृतदेह होता. मारोती जाधव यांच्या नातेवाईकांनी शनिवारी सदर मृतदेहाची ओळख मारोती जाधव म्हणून केली. तसेच ख-या मारोती जाधव यांच्या मृतदेहाचे अंतिम संस्कार नगर परिषदेमार्फत करण्यात आले. सदर संपूर्ण वस्तुस्थिती रोशन ढोकणे यांच्या कुटुंबियांना समजावून सांगण्यात आली. तसेच त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता त्यांनी ती मान्य केली आणि उपोषणाची सांगता झाली.
संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल मंगळवापर्यंत सादर होण्याची शक्यता असून संबंधित दोषीवर योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी कळविले आहे.
०००००००