उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाचक पोलीस उपनिरीक्षकाने केली कामगारास मारहाण….! अन्यायग्रस्त कामगाराचा आत्मदहनाचा इशारा….!
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या वाचक पोलीस उपनिरीक्षकाने केली कामगारास मारहाण….!
अन्यायग्रस्त कामगाराचा आत्मदहनाचा इशारा….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणीबाणी सदृश्य स्थिती असल्याचा फायदा घेत काही पोलीस आतातायीपणा करत नागरिकांवर दबाव टाकत अन्याय करीत असल्याच्या अनेक घटना अधूनमधून समाजमाध्यमात व्हायरल होत असल्याने पोलीस प्रशासनाबाबत नागरीकात नाराजीचा सूर उमटत असतांनाच माहूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात वाचक पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेल्या शरद घोडके यांनी कामावर जात असलेल्या कामगारास कॉलर पकडून खाजगी वाहनात कोंबून पोलीस स्टेशनमध्ये नेऊन सुंदरीने मारहाण केल्याची घटना दि.०६ एप्रिल रोजी सकाळी माहूर येथे घडली असल्याने पोलीस प्रशासनाच्या आततायीपणाबद्दल जनतेत नाराजीचा सुर दिसून येत आहे. पंधरा दिवसात अन्याय करणाऱ्या पोलीस निरीक्षकास निलंबित करून न्याय द्या अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा कृष्णा जाधव दत्तमांजरी या अन्यायग्रस्त कामगाराने पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे माहूर यांना दिलेल्या तक्रारीत दिला आहे.
याबाबत सविस्तर असे की, गेल्या अनेक महिन्यापासून माहूर शहरात नगरपंचायत मार्फत विविध विकासकामे सुरु आहेत. दरम्यानच्या काळात कोरोणाचा वाढता कहर पाहता जिल्हाधिकरी नांदेड यांनी जिल्ह्यात ४ एप्रिल पर्यत लॉकडाऊन केले असल्याने व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकएंड लॉकडाऊन घोषित करून शासकीय बांधकामाना मुभा दिली आहे तसेच कामावर असतांनाच कामगार जर कोरोनाबाधित निघाल्यास त्यास संपूर्ण पगार देण्याचे आदेशात नमूद केले आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीशी व त्यानिमित्य करण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमध्ये पोलीस प्रशासनाच्या सिंघमगिरीला तोंड देत पोटाची खळगी भरण्यासाठी माहूर तालुक्यातील दत्तमांजरी येथील कामगार कृष्णा रोहिदास जाधव वय ३० वर्षे हा माहूर नगरपंचायत मार्फत पवार कनस्ट्रकशन कंपनीच्या वसमतकर महाराज मठाशेजारी सुरु असलेल्या सीसीरोडच्या कामावर दि. ६ रोजी सकाळी ९:०० ते ९:३० वा.च्या दरम्यान जात असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माहूर येथे वाचक पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेले शरद घोडके यांनी शहरातील रेणुकादेवी रोड थावरा नाईक यांच्या घराजवळ खाजगी वाहनाने येऊन कृष्णा जाधव या कामगाराची कॉलर पकडून उचलून खाजगी वाहनात कोंबले व पोलीस स्टेशन माहूर येथे नेऊन सुंदरीने मारहाण केली. कामगार कृष्णा जाधव हा त्यांना माझा गुन्हा काय असे विचारले असता त्यास त्याने काय गुन्हा केला याची माहिती सुद्धा देण्याचे औदार्य न दाखवता किंवा पोलीस स्टेशनमध्ये नेतांना अटक केल्याची नातेवाईकांना सूचना देण्याचे किंवा त्यास त्याचा काय गुन्हा हे सुद्धा कळविण्याचे महत्वाचे न समजून नियमबाह्यरीतीने त्यास उचलून खाजगी वाहनात कोंबून पोलीस स्टेशनला नेऊन सुंदरीने मारहाण करून पोलीस ठाण्यातून हाकलून दिले.
शरद घोडके पोलीस उपनिरीक्षक हे गेल्या तीन वर्षांपासून माहूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर होते सध्या ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय माहूर येथे वाचक पोलीस उपनिरीक्षक आहेत.सदर प्रकरणाची चौकशी करून मला विनाकारण कॉलर पकडून खाजगी वाहनाने पोलीस स्टेशनला नेऊन मारहाण करून मला नाहक मनस्ताप देऊन माझी बदनामी करून मला आत्महत्या करून जीवनयात्रा संपविण्यास मजबूर करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांना त्वरित निलंबित करून मला न्याय द्यावा. अन्यथा पंधरा दिवसात मला न्याय न मिळाल्यास कोणत्याही क्षणी आत्मदहन करून मला जीवनयात्रा संपवावी लागेल व माझ्या मरणास सर्वस्वी पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके हे जबाबदार असतील असे निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, गृहमंत्री दिलीप वळ्से पाटील, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, पोलीस आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हाधिकारी नांदेड, विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड, पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, तहसीलदार माहूर, उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर, प्रफुलभाऊ जाधव तालुकाध्यक्ष गोर सेना तालुका माहूर, व पत्रकारांना दिल्या आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता कामगार कृष्णा जाधव हा दत्तमांजरी येथून सकाळी ८:३० च्या सुमारास ऑटोने माहूरकडे येत असतांना रस्त्यात एका शुल्लक कारणावरून येथील एका भाजप नेत्याच्या नातेवाईकाशी त्याचा वाद झाला तो वाद नंतर त्यांनी आपसी समझोता करून मिटविला परंतु माहूर येथे आल्यानंतर सदरील भाजपने त्याच्या भावाने उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांचे वाचक शरद घोडके यांना फोन करून बोलावून घेतले व त्याच्या समक्ष सदर कामगारास कॉलरला धरून उचलून खाजगी वाहनात कोंबून पोलीस स्टेशनला नेऊन सुंदरीने मारहाण करून हाकलून दिले असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत कामगार कृष्णा जाधव हा माहूर पोलीस स्टेशन येथे सायंकाळी ४ वाजता पासून ते ८ वाजेपर्यत तक्रार देण्यासाठी हजर असतांना त्याची तक्रार स्वीकारण्यास स्पष्ट नकार देत एका राजकीय नेत्याकडून अन्यायग्रस्त व्यक्तीलाच दमदाटीकरून हाकलून देण्यात आले. ही बाब काही समाजसेवकांना कळल्यानंतर रात्री उशिरा अंदाजे ९:३० ते १० वाजता माहूर पोलिसांनी तक्रार स्वीकारली असल्याची बाब समोर आली आहे. सदरक्षणाय खलनिग्रहनाय असे ब्रीद असणारी पोलीस यंत्रणा सर्वसामान्य जनतेसाठी नसून राजकीय नेते व त्यांच्या नातेवाईकासाठीच आहे की काय असा प्रश्न या निमित्याने उपस्थित होत आहे.
@ मी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा सामान्य नागरिक आहे. माझ्या आजवरच्या आयुष्यात मी कधीही कायद्याचा भंग केलेला नसून चारित्र्यसंपन्न व स्वाभिमानाने जीवन जगणारा व्यक्ती आहे. आजपर्यंत माझ्या गावात किंवा कुठेही मला एवढी अवमानकारक वर्तणूक कुणीही केलेली नसल्याने या प्रकाराने माझा आत्मसन्मान दुखावला गेला आहे. सदर प्रकाराने माझी समाजात नाहक बदनामी झाली असून माझ्या बाबत समाजात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. या उलटसुलट चर्चेने मला प्रचंड मानसिक त्रास होत आहे.आपण एवढ्यावरच थांबणार नसून मानवी हक्काचे उल्लंघन करून मला अमानवी वागणूक दिल्याबदल मानव हक्क आयोगाकडे सुद्धा दाद मागणार आहे :- कृष्णा रोहिदास जाधव