महागाव औषधी विक्रेता संघा तर्फे स्वर्गरथाचे लोकार्पण…
महागाव औषधी विक्रेता संघा तर्फे स्वर्गरथाचे लोकार्पण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :-
महागाव तालुका औषधी विक्रेता संघाकडून तालुक्यातील जनतेच्या सेवेकरिता स्वर्ग रथाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. स्वर्ग रथाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत काल शनिवारी पार पडला. यवतमाळ जिल्हा औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष पंकज नानवाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अमरावती झोनचे अध्यक्ष संजय पिंपळखुटे,संजय बोरले, संजय बनगीनवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, अनिल नरवाडे, शैलेश कोपरकर, रामराव पाटील नरवाडे, महागाव तालुका औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष श्रीरंग चिद्दरवार, किशोर बोंपीलवार,जगदीश नरवाडे, मालाताई देशमुख, माजी नगरसेविका आशा भरवाडे, छाया वाघमारे, जयश्री नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महागाव मुख्यालयास तालुक्याचा दर्जा मिळून ३८ वर्ष झाली, परंतू शहरात मृतदेहाची अंत्ययात्रा काढण्यासाठी शववाहिनीची (स्वर्गरथ) सुविधा नव्हती, परिणामी खांद्यावर तिरडी घेऊन स्मशानभूमी पर्यंत अंतयात्रा काढावी लागत असे.जनतेच्या सोयीसाठी स्वर्ग रथाची सुविधा महागाव औषधी विक्रेता संघाने करून दिली. समाजहिताच्या कामात केमिस्ट बांधव सातत्याने पुढे असतात. यापुढेही समाजोपयोगी कामात संघटनेचा पुढाकार राहील अशी ग्वाही पंकज नानवाणी आणि संजय पिंपळखुटे यांनी दिली. कोविड महामारीत रुग्णांसाठी रक्ताची कमतरता जाणवत असून महागाव येथे लवकरच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल अशी माहिती श्रीरंग चिद्दरवार यांनी दिली. यावेळी मंचावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. स्मशानभूमीतील विकास कामांसाठी सतीश देवरकर, दिलीपराव कोपरकर, गजानन वाघ, संतोष नरवाडे, किसन घोडे, विनोद पहुरकर, किराणा असोसिएशनचे उदय नरवाडे, नितीन येरावार,विशाल चक्करवार, वासुदेव नेवारे यांनी रोख आर्थिक मदत दिली. या मान्यवरांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वर्गरथाचे मोफत सारथ्य करण्याची जबाबदारी पत्रकार ज्ञानेश्वर ठाकरे आणि नंदकुमार कावळे यांनी घेतली, त्यांचाही समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्रीरंग चिद्दरवार, जयंत चौधरी, सुनील पोदुटवार व केमिस्ट बांधवांनी हा कार्यक्रम यशस्वी केला.
जनतेच्या सुविधेसाठी ॲम्बुलन्स आणि शीत शवपेटी
महागाव तालुक्यातील जनतेच्या सुविधेसाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्याचा संकल्प शिवाजीराव देशमुख सवनेकर यांनी जाहीर केला. स्व. गणपतराव पाटील नरवाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शीत शवपेटी ( फ्रिझर) देण्याचा संकल्प सौ.जयश्री संजय नरवाडे यांनी व्यक्त केला.