‘बंडू बॉस’ जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत, उद्धव ठाकरेंचा पहिला दणका, परभणीत भाकरी फिरवली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव हे मूळ शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीत ‘भाकरी फिरवत’ पहिला मोठा संघटनात्मक दणका दिला आहे.
परभणी जिल्हाप्रमुख पदी असलेले आणि खासदार संजय जाधव यांचे खंदे समर्थक मानले जाणारे गंगाप्रसाद आनेराव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता विष्णू मुरकुटे यांची नवीन जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परभणी आणि गंगाखेड या दोन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आता मुरकुटे यांच्या खांद्यावर असेल.
‘त्या’ बैठकीतच ठरलं, बंडू जाधवांना दणका द्यायचा!
२५ एप्रिल रोजी मुंबईतील शिवसेना भवन येथे परभणी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला खासदार संजय जाधव यांच्यासह जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, काही उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख अनुपस्थित राहिले होते. ठाकरेंनी बैठक बोलावूनही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने पक्षनेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली होती.
बंडू जाधव शिंदे सेनेच्या वाटेवर?
खासदार संजय जाधव हे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. संजय जाधव हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. खासदार जाधव यांच्या संभाव्य बंडाचा अंदाज घेऊन उद्धव ठाकरेंनी परभणीतील संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे.
संजय जाधव यांच्या समर्थकांना महत्त्वाच्या पदांवरून बाजूला करून उद्धव ठाकरेंनी परभणीत आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्हाप्रमुख बदलणे हा संघटनात्मक बदलातील पहिला मोठा टप्पा असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, निष्ठावंतांना संधी देऊन पक्षातील संभाव्य गळती रोखण्याचे आव्हान आता ठाकरे गटासमोर असणार आहे.
सेना फुटली तरीही उद्धव ठाकरेंना साथ, आता मात्र शिंदे सेनेत जाण्याच्या चर्चा
चार वर्षांपूर्वी शिवसेना पक्षाची दोन शकले झाली. तेव्हा अनेक खंद्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. अशावेळी खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे पसंत केले. परभणीच्या जनतेलाही संजय जाधव यांचे शिवसेनेसोबत निष्ठेने राहणे आवडले. २०२४ लोकसभेला महादेव जानकर समोर असतानाही संजय जाधव मोठ्या मताधिक्याने निवडून आले. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या शिंदेसेनेतल्या प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय, सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य, अजितदादांचा रेकॉर्ड मोडला….
नोटा पेक्षाही कमी मते, तरी करूणा मुंडे म्हणाल्या, माझा विजय तेव्हाच झाला, जेव्हा…
तंबूच उखाडला. पराभव लागला जिव्हारी, तामिळनाडूत छप्परफाड ‘विजय’
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….