शेतकऱ्यांची दिवाळी काळोखात ; सरकार अपयशी : वडेट्टीवार….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “शेतकऱ्यांच्या डोळ्यांतले पाणी, उद्वस्त झालेली घरे आणि थंड पडलेले सरकार यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे. बळीराजाच्या घरात दिवाळीला अंधार असणार असल्याचा संताप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
सप्टेंबर या एकाच महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांची २६ लाख हेक्टरवरील पिकं उद्वस्त झाली आहेत, ५२ लाख हेक्टरवरील खरीप पिकं पाण्यात गेली आहेत. मोडलेल्या बळीराजाला उभं करण्याऐवजी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सरकार व्यस्त आहे, पक्षाच्या बैठका सुरू आहेत.
तोंडावर दिवाळी आली आहे, पण शेतकऱ्याना कोण विचारत आहे. दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत करणार असे सरकार सांगत होते.. अजूनही मदत मिळालेली नाही. कसली दिवाळी? कुठून आणावे गोडधोड पदार्थ, मुलांसाठी कपडे? हे सरकार म्हणजे बडा घर पोकळ वासा आहे.
किमान हेक्टरी ५० हजारांची मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे! दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत झाली तर त्यांच्या आयुष्यात दिवाळी होईल असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.