प्रशांत किशोर यांची बिहार विधानसभा निवडणुकीतून माघार….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पाटणा :- “बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीसाठी इंडिया आणि एनडीए आघाडीला प्रशांत किशोर यांचा जनसुराज्य पक्षही यंदा टक्कर देत आहे.
राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी गेल्या काही काळापासून बिहारमध्ये सत्तापालट करण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत होते. मात्र आता विधानसभेच्या तोंडावर त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘आमच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयानुसार मी निवडणुकीला उभा राहणार नाही, त्याऐवजी मी इतर उमेदवारांचा प्रचार करणार आहे’, असे प्रशांत किशोर यांनी जाहीर केले.
प्रशांत किशोर म्हणाले, ‘मी जर स्वतः निवडणुकीला उभा राहिलो तर पक्षाच्या प्रचाराकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यातून पक्षसंघटनेच्या कामाला फटका बसेल. त्यामुळे पक्षहितासाठी हा निर्णय घेतला आहे.’
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्याविरोधात राघोपूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत किशोर निवडणूक लढवतील, असे सांगितले जात होते. मात्र आता या मतदारसंघातून स्थानिक व्यावसायिक चंचल सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता तेजस्वी यादव विरुद्ध प्रशांत किशोर असा सामना होणार नाही.
प्रशांत किशोर म्हणाले की, जर बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाचा विजय झाला तर त्याचा राष्ट्रीय स्तरावर परिणाम होईल. राष्ट्रीय राजकारणाची कमान वेगळ्या दिशेने जाईल. प्रशांत किशोर म्हणाले, बिहारच्या निवडणुकीत आमच्या पक्षाचा एकतर बहुमताने विजय होईल किंवा पक्षाच सपशेल पराभव होईल. या दोनच शक्यता मला दिसत आहेत.
मी आजवर अनेकदा पूर्ण खात्रीने सांगत आलो आहे की, माझ्या पक्षाला एकतर १५० हून अधिक जागा किंवा १० पेक्षाही कमी जागा मिळतील. याच्या अधेमधे इतर काही होण्याची शक्यता नाही, असे विधान प्रशांत किशोर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, २४३ विधानसभेच्या जागांवर नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाला २५ जागा जिंकण्यासाठीही संघर्ष करावा लागेल. नितीश कुमार यांच्या पक्षाची स्थिती बिकट झाली असून ते पुन्हा मुख्यमंत्री होणे अवघड आहे. तसेच यंदा एनडीएमध्ये गोंधळाची परिस्थिती दिसत आहे. भाजपा आणि जेडीयू कोणत्या जागा लढवणार याची निश्चिती अद्याप झालेली नाही.
प्रशांत किशोर यांच्या पक्षाने आतापर्यंत उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. या निवडणुकीत यश मिळाले नाही आणि लोकांनी जर विश्वास टाकला नाही तर यापुढेही समाज आणि रस्त्यावर उतरून पक्ष संघटनेचे काम करत राहणार, असेही त्यांनी म्हटले. बिहारमध्ये ६ आणि ११ नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.