नवी आबादी शाळेला अखेर उर्दू शिक्षक मिळाले ; सिराज रजा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :- “गेल्या दोन वर्षांपासून उर्दू शिक्षकांच्या कमतरतेमुळे त्रस्त असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक नवी आबादी शाळेला अखेर उर्दू शिक्षक मिळाले आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सिराज रजा यांनी या काळात संबंधित अधिकार्यांना वारंवार पत्रव्यवहार करून शिक्षक नेमणुकीची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा, माहूर येथून विनंती बदलीद्वारे ज्येष्ठ उर्दू शिक्षक लियाखत अली सर यांची बदली नवी आबादी शाळेत करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या तीस वर्षांच्या दीर्घ सेवेत असंख्य विद्यार्थ्यांना घडवले असून, त्यांच्या शिष्यांपैकी अनेकजण आज डॉक्टर, शिक्षक तसेच प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
रुजू होताना लियाखत सर म्हणाले,
“माझ्या उरलेल्या सेवाकाळात मी नवी आबादी शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम करणार आहे.”
दि. 11 ऑक्टोबर रोजी शाळेत त्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले. अध्यक्ष श्री. सिराज रजा यांनी शाल व फळांची टोपली देऊन त्यांचा सत्कार केला.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ललिता जोशी मॅडम, ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक एस. एस. पाटील सर, उर्दू विभागाचे शिक्षक जमीर अहमद सर, सौ. नखाते मॅडम व सय्यद मुजीब सर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ. ललिता जोशी मॅडम यांनी लियाखत सरांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. सहाय्यक शिक्षक एस. एस. पाटील सर व सौ. नखाते मॅडम यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला, तर उर्दू विभागाचे जमीर अहमद सर आणि सय्यद मुजीब सर यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. दोन वर्षांनंतर उर्दू शिक्षक मिळाल्याने शाळेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.