पुण्यातील मंचरमध्ये मशिदीचा भाग कोसळला; भुयारासारखी रचना आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ, 200 पोलीस तैनात….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामादरम्यान एका जुन्या मशिदीचा काही भाग अचानक कोसळला. या कोसळलेल्या जागी भुयारासारखी रचना आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर हिंदू संघटनांनी या भुयाराचा पुरातत्वीय तपास व्हावा अशी मागणी केली, तर मुस्लिम संघटनांनी मशिदीच्या झालेल्या नुकसानीवर नाराजी व्यक्त केली.
मशिदीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना आणि त्यानंतर समोर आलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितलं की, मंचर येथील घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही समाजातील लोकांना शांततेचे आवाहन करण्यात आले होते आणि मंचर शहरातील नागरिकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सध्या सुमारे 200 पोलीस तसेच एसआरपीएफच्या दोन तुकड्या तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.
दुसरीकडे, आंबेगावचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले की, नगरपंचायतीमार्फत सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामादरम्यान हा भाग पडला आणि भुयार समोर आले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पाहणी करून दोन्ही समाजातील नागरिकांशी चर्चा केली आहे. संवादातून सामंजस्य साधण्याचा प्रयत्न सुरू असून, परिसरात शांतता अबाधित ठेवण्यासाठी सतत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, मशीद परिसरात आढळलेल्या या भुयाराची तपासणी आता पुरातत्व विभागामार्फत होणार असून, त्यानंतरच या रचनेविषयी अधिकृत माहिती समोर येणार आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता ठेवावी, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.