“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “काय म्हणता धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर..! अशी खोचक टिप्पणी करणारी पोस्ट माजी आमदार तथा शिवसेनेचे (शिंदे) नेते रवींद्र धंगेकर यांनी एक्सवर केली आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीनीच्या व्यवहारावरून धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. यामुळे पुण्यात शिवसेना (शिंदे) विरुद्ध भाजपा असा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रपक्षांनीच साथ सोडल्यामुळे आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी विरोधात शड्डू ठोकल्यामुळे मोहोळांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री केल्याच्या मुद्द्यावरुन पुण्याचं राजकारण तापलं आहे. या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जैन बोर्डिंग हाऊसची जमीन ज्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आली आहे त्यात खासदार मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा आरोप केला जात होता. मात्र मोहोळ आणि गोखले यांच्या कंपनीचा काहीही संबंध नसल्याच भाजपाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तशी कथित कागदपत्र देखील सादर करण्यात आली आहेत.
रवींद्र धंगेकर पुरावे सादर करणार?
दरम्यान, जमीन चोर निघाला मुरलीधर असं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी याप्रकरणी लवकरच भाष्य करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यावर काय टिप्पणी करतात, काही पुरावे सादर करतात का? याप्रकरणी पत्रकार परिषद घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीवेळी महायुतीत लढत
दरम्यान, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मुरलीधर मोहोळ यांनी आव्हान उभं केलं आहे. संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही नेत्यांनी अर्ज केले आहेत. शनिवारी (१८ ऑक्टोबर) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दोघांपैकी कोणत्याही नेत्याने अर्ज मागे घेतलेला नाही. पवार व मोहोळ दोघेही आपापल्या उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी दोघांमध्ये थेट सामना होणार आहे. अजित पवार हे संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी मोहोळ यांच्याविरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत महायुतीत संघर्ष पाहायला मिळेल.